रशिया, कोरिया, फिलिपाईन्स, चीन देशातील शिकारी पक्षी सोलापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 10:54 AM2019-11-19T10:54:08+5:302019-11-19T10:56:12+5:30

परदेशी पक्ष्यांचा प्रवास : पाईड हॅरियर, युरेशियन स्पॅरो, रेड नेक फाल्कन हे विदेशी पक्षी दाखल

The birds of prey in Russia, Korea, Philippines, China, Solapur | रशिया, कोरिया, फिलिपाईन्स, चीन देशातील शिकारी पक्षी सोलापुरात

रशिया, कोरिया, फिलिपाईन्स, चीन देशातील शिकारी पक्षी सोलापुरात

googlenewsNext
ठळक मुद्देपरदेशातून आलेले शिकारी पक्षी हे सोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांचे मित्र बनलेसोलापूर जिल्ह्यातील उजनी, हिप्परगा, कुरनूर, होटगी या धरण परिक्षेत्राचे आवार मोठेगवताळ भागातील नागरिकांना पक्ष्यांसंदर्भातील महत्व पटवून देणे गरजेचे

सोलापूर : जिल्ह्यात पसरलेल्या गवताळ भागात पक्ष्यांना लागणारे अन्न मुबलक प्रमाणात मिळत असल्याने परदेशी पक्ष्यांचा मुक्काम सोलापुरात दिवसेंदिवस वाढू लागला आहे़ यंदा हिवाळ्याची चाहूल लागताच सोलापुरात रशिया, कोरिया, पाकिस्तान, फिलिपाईन्स, चीन या देशांचा प्रवास करून जगातील ७५ ते १०० शिकारी पक्षी सोलापुरात दाखल झाल्याची माहिती सुप्रसिध्द वाईल्डलाईफ फोटोग्राफर आणि पक्षीमित्र डॉ़ व्यंकटेश मेतन यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

सोलापूर हे पक्ष्यांचं नंदनवन आहे हे आता सर्वांना परिचितच आहे़ दरवर्षी हिवाळ्यात परदेशातून अनेक पक्षी स्थलांतर करून सोलापूर आणि सोलापूरच्या आजूबाजूच्या परिसरात येतात़ यावर्षीसुध्दा अनेक परदेशी पक्ष्यांचं सोलापुरात आगमन झालेलं आहे़ यात मोन्टोगो हॅरियर (मोंटुग्याचा भोवत्या), पॅलिड हॅरियर (पांढºया भोवत्या), युरेशियन मार्श हॅरियर (दलदली भोवत्या), पाईड हॅरियर (कवड्या भोवत्या/हारीण), कॉमन केस्ट्रल (सामान्य खरूची), रेड नेक फाल्कन (लाल डोक्याचा ससाणा), युरेशियन स्पॅरो हॉक (युरेशियन चिमणीमार ससाणा) हे शिकारी पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून सोलापूर परिसरात आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील उजनी, हिप्परगा, कुरनूर, होटगी या धरण परिक्षेत्राचे आवार मोठे असल्याने येथे मुबलक प्रमाणात जैवविविधता आढळते. त्यामुळे हा भाग सुजलाम् सुफलाम् असल्याने परदेशी दुर्मिळ पक्ष्यांचा सोलापूरकडील ओढा वाढला आहे़ मागील आठवड्यात कुरनूर धरणावर आॅस्प्रे हा शिकारी पक्षीदेखील दिसला गेला़ त्याचे आवडते खाद्य मासे आहे. हा एक विश्वव्यापी पक्षी असून, याचे प्रजनन केवळ अमेरिकेतील भौगोलिक परिस्थितीत होते. 

वास्तविक हा पक्षी आपल्याकडे जास्त प्रमाणात आढळत नसल्याचेही पक्षीमित्रांनी सांगितले.

तर जगभरातील पक्षीप्रेमीही सोलापुरात येतील
- सोलापूर आणि सोलापूरच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी, वन्यजीवावर काम करणाºया अनेक निसर्गप्रेमींनी, निमसरकारी संघटनांनी तसेच वनविभागाने गवताळ प्रदेशाचे संरक्षण, त्यावर होणारे मानवांचे अतिक्रमण, अवैध पक्ष्यांची होणारी शिकार यावर प्रतिबंध घालणे गरजेचे आहे़ तसेच गवताळ भागातील नागरिकांना पक्ष्यांसंदर्भातील महत्व पटवून देणे गरजेचे आहे़ असे झाल्यास भारतातूनच नव्हे तर जगभरातून अनेक वन्यजीवप्रेमी, पक्षीप्रेमी, वाईल्डलाईफ फोटोग्राफर्स हे सोलापूरला भेट देण्यास येतील, असा विश्वास डॉ़ व्यंकटेश मेतन यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला़ 

शिकारी पक्षी शेतकºयांचे मित्र
- परदेशातून आलेले शिकारी पक्षी हे सोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांचे मित्र बनले आहेत. शेतीला उपद्रव करणारे मोठे किडे, कीटक, नाकतोडे, टोळ, उंदीर, घुशी, ससे, मासे, साप, पक्षी, फडफड, लहान सस्तन प्राणी, सरडे यांची शिकार करून नैसर्गिक नियंत्रक म्हणून ते कार्य करतात़ त्यामुळे नक्कीच हे परदेशातील शिकारी पक्षी सोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांचे मित्र बनले आहेत़

Web Title: The birds of prey in Russia, Korea, Philippines, China, Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.