पालकांनो, आता शुल्कवाढीला विरोध करणं अवघड होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 06:42 PM2019-12-13T18:42:39+5:302019-12-13T18:47:04+5:30

शुल्क विनियमन कायद्यातील तरतुदीमुळे पालकांच्या खिशावर अतिरिक्त भार येण्याची शक्यता

amendment in maharashtra educational institute fee regulation now complaint from 25 percent parents requires | पालकांनो, आता शुल्कवाढीला विरोध करणं अवघड होणार

पालकांनो, आता शुल्कवाढीला विरोध करणं अवघड होणार

Next

अमरावती : भरमसाठ शुल्क वाढविणाऱ्या शाळांविरुद्ध आता एकट्या पालकास तक्रार करता येणार नाही. शाळांविरूद्ध शुल्कवाढीबाबत तक्रार द्यायची असल्यास एक नव्हे तर, २५ टक्के पालकांची गरज राहील, असे शुल्क विनियमन कायद्यात तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शुल्कवाढ करण्यास शैक्षणिक संस्था चालकांना दरवाजे खुले झाल्याची चर्चा पालकांमध्ये सुरु झाली आहे. राज्य शासनाने घात केला, असा आरोप करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम २०११ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यापूर्वीच्या भाजप सरकारने शैक्षणिक संस्था चालकांच्या बाजुने शुल्कवाढीला झुकते माप दिल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर शुल्क वाढीस शाळा व्यवस्थापनाला विलंब शुल्क व्याजासह आकारण्याची मुभा मिळाली आहे. शाळांच्या मनमानी शुल्कवाढीबाबत पालक आणि शाळा व्यवस्थापन यांच्यात गत काही वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. त्यामुळे शाळांच्या शुल्कवाढीवर अंकुश आणण्यासाठी या अधिनियमांची १ डिसेंबर २०१४ पासून अंमलबजावणी करण्यात आली. दरम्यान शुल्क विनियमन कायद्यात काही त्रुट्या असल्याचा आक्षेप घेत यात सुधारणा करण्याची मागणी पालकांकडून करण्यात आली होती. त्या अनुषंगाने राज्य शासनाने शुल्क विनियमन कायद्याच्या अधिनियमांचा अभ्यास करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती व्ही. जी. पळशीकर यांच्या अध्यक्षतेत समिती नेमली होती. या समितीच्या शिफारशींचा विचार करुन या अधिनियमात शासनाने काही सुधारणा केल्या आहेत. नव्या सुधारणेनुसार शुल्कवाढ विरोधात एकट्या नव्हे तर, २५ टक्के पालक एकत्र येऊन तक्रार करावी लागणार आहे. अन्यथा ही तक्रार निरर्थक ठरेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शुल्क विनियमन कायदा हा शिक्षणाचे बाजारीकरण करण्यास रान मोकळे झाल्याचा आरोप पालकांकडून होत आहे. गत वर्षी नोव्हेंबर महिन्यात या विधेयकाला मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

शुल्क विनियमन कायद्यात सुधारणा म्हणजे पालकांच्या घटनात्मक अधिकारावर गदा आणली आहे. नव्या सुधारणेत शैक्षणिक संस्थांना झुकते माप दिले आहे. शुल्कवाढीला विरोध करण्यासाठी पालकांची संख्या जुळविताना दमझाक होणारी आहे.
- राजेश सपकाळे, पालक अमरावती

Web Title: amendment in maharashtra educational institute fee regulation now complaint from 25 percent parents requires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.