भर सभेत एका खासदाराच्या ‘मृत्यूची कामना’ करतात?; देवेंद्र फडणवीस नाना पटोलेंवर संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 03:41 PM2024-04-05T15:41:24+5:302024-04-05T15:42:10+5:30
Akola Loksabha Election: अकोला लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपा, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. त्यातच काँग्रेस उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या विधानामुळे भाजपा नेते संतापले आहेत.
मुंबई - Devendra Fadnavis on Nana Patole ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झाली असून यात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत. त्यात अकोला इथं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या एका विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले आहेत. नाना पटोले भरसभेत एका खासदाराच्या मृत्यूची कामना करतात हा असंवेदनशीलतेचा कहर आहे असं फडणवीसांनी सुनावले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काँग्रेस पक्ष एकीकडे दिल्लीत ‘न्यायपत्र’ जाहीर करतो आणि दुसरीकडे त्यांचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भर सभेत एका खासदाराच्या ‘मृत्यूची कामना’ करतात?. असंवेदनशीलतेचा हा कहर आहे. निवडणुकीत आपण विरोधक असलो तरी विरोधकांच्या मृत्यूची कामना, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्र आणि अकोल्यातील जनतेची तात्काळ माफी मागा अशी मागणी करत खा. संजय धोत्रे यांना दीर्घायुष्य लाभावे, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो असं त्यांनी ट्विटद्वारे सांगितले.
नेमकं काय म्हणाले नाना पटोले?
२०१४ ते २०१७ या कालावधीत नोटबंदी आणि जीएसटीचा निर्णय झाला तेव्हा मी स्वत: त्याचा विरोध केला. इथले खासदार जे आता आहेत तेही होते. ते आता व्हेटिंलेटरवर आहेत, व्हेंटिलेटर कधी काढतील माहिती नाही. पण निवडणुकीतच काढतील असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विद्यमान खासदार संजय धोत्रेंबाबत केले. पटोलेंच्या याच विधानावरून भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार संजय धोत्रे हे सध्या आजारी असून त्यांची प्रकृती खालावली आहे. या मतदारसंघात भाजपा महायुतीकडून धोत्रेंचे पुत्र अनुप धोत्रे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. अकोला इथं वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर, काँग्रेस मविआकडून अभय पाटील यांच्यासह २८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. संजय धोत्रे हे गेल्या २० वर्षापासून अकोल्याचे खासदार आहेत. १९९९ मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २००४ पासून सातत्याने ते खासदार आहेत. मोदी सरकारच्या काळात ते केंद्रात मनुष्यबळ विकास राज्यमंत्रीही राहिलेत.