दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 06:05 AM2024-05-10T06:05:33+5:302024-05-10T06:08:13+5:30

Maharashtra Politics: मित्रांनीच डोकेदुखी वाढविली, आता ऐक्यासाठी नेतेमंडळींची सुरू आहे भिरभिर

Ajit Pawar upset in Dindori, Shinde group in Nandurbar-Jalgaon; Non-cooperation tension in the alliance maha yuti maharashtra's reamining 24 lok sabha election | दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 

दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 

- यदु जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात अद्याप दोन टप्प्यात २४ मतदारसंघातील मतदान बाकी असताना महायुतीचे विविध मतदारसंघांमधील नेते, आमदार हे मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे चित्र दिसत नसल्याने चिंता वाढली आहे. वरिष्ठ पातळीवरून मनोमिलनाचे प्रयत्न सुरू आहेत; पण अद्याप हवे तसे यश त्यात आलेले नाही. नाशिक, दिंडोरीत नाराजी उघडपणे बोलून दाखविली जात आहे.

भाजपचे राज्यातील एक मोठे नेते म्हणाले की, तिन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये उत्तम समन्वय राहावा, असे प्रयत्न आम्ही करत आहोत. मित्रपक्षांचे उमेदवार आहेत, तिथे आम्ही पूर्ण मदत करत आहोत. शेवटी आम्ही वधूपक्षाचे लोक आहोत, मोदींना पंतप्रधान करायचे असल्याने आम्हाला कुठेही कमी पडून चालत नाही, असे हा नेता म्हणाला.

अजित पवार यांच्यासोबत अजित पवार गटाचे काही आमदार नाहीत, अशी जोरदार चर्चा आहे. या आमदारांचे प्रमुख कार्यकर्ते शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारात उतरले असल्याचे म्हटले जात आहे. त्यातच या मतदारसंघातील येवल्याचे आमदार असलेले राज्याचे मंत्री छगन भुजबळ हे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत नसल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी जाहीरपणे केला आहे. नाशिकमध्ये उमेदवारी न मिळाल्याची भुजबळ यांची नाराजी कायम असल्याचे म्हटले जाते. निवडणुकीत या नाराजीचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसू नये यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून मनधरणी केली जाण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेकडे लक्ष...
नंदुरबार मतदारसंघात भाजपच्या डॉ. हीना गावित यांच्या प्रचारात अजित पवार गट उतरला आहे; पण शिंदेसेनेचे तेथील प्रमुख नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी सक्रिय दिसत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी नंदुरबारमध्ये सभा होत असताना रघुवंशी काय भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता आहे. रघुवंशी आणि आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यात नेहमीच संघर्ष होत आला आहे. गावित यांच्या कन्या डॉ. हीना यांनी रघुवंशी यांची भेटही घेतली; पण त्याचा फायदा झालेला दिसत नाही. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी रघुवंशी यांना समजावले असल्याचे समजते.

जळगावी केळी कोण खातंय?
जळगाव, रावेर मतदारसंघांत शिंदेसेनेचे आमदार, नेते भाजप उमेदवारांच्या पाठीशी एकदम भक्कमपणे उभे असल्याचे चित्र अजूनही दिसत नाही. उद्धवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी जळगावमध्ये येऊन शिंदेसेनेच्या आमदारांवर आरोप केल्यानंतर शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी, 'मी आतापर्यंत सक्रिय नव्हतो; पण आता महायुतीला जिंकवणारच' असे जाहीर केले. त्यांनी मुक्ताईनगरचे खडसेंचे कट्टर विरोधक शिंदेसमर्थक आमदार चंद्रकांत पाटील यांची गुरुवारी भेट घेतली आणि रक्षा खडसे यांच्या प्रचारात सक्रिय होण्यास सांगितले.
शिंदेसेनेचे आमदार भाजप-शिवसेना युतीमध्ये २०१९ ला लढले तेव्हा भाजपचे बंडखोर त्यांच्याविरुद्ध उभे होते. 'आज तुम्ही आमचा पाठिंबा मागताय; पण तेव्हा तुम्ही आम्हाला त्रासच दिला होता,' अशी आठवण या आमदारांनी भाजपच्या नेत्यांना जाहीरपणे करून दिलेली होती. धुळ्यात सुरुवातीला नाराजी होती, आम्हाला विश्वासात घेतले जात नाही, अशी शिंदेसेनेची आणि अजित पवार गटाची नाराजी होती, ती आता दूर झाली आहे.

Web Title: Ajit Pawar upset in Dindori, Shinde group in Nandurbar-Jalgaon; Non-cooperation tension in the alliance maha yuti maharashtra's reamining 24 lok sabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.