शिवसेनेचे दिग्गज आमदाराच भाजपच्या संपर्कात ?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 03:43 PM2019-10-28T15:43:28+5:302019-10-28T16:23:54+5:30
आधी फार्म्युला नंतर सत्तास्थापना अशी भूमिका शिवसेनेने घेतली असून अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची मागणी सुधा केली आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपकडून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरु आहे. तर दुसरीकडे युतीत असलेली शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडवून बसली आहे. मात्र असे असली तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचा ‘बी’ प्लॅन तयार असून, शिवसेनेचे १५-१६ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत युतीचा १६१ जागांवर विजय झाला असून भाजपचे १०५ तर शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडे शिवसेना वेतिरिक्त दुसरा पर्याय नाही. मात्र आधी फार्म्युला नंतर सत्तास्थापना अशी भूमिका शिवसेनेने घेतली असून अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची मागणी सुधा केली आहे. अन्यथा दुसरा पर्याय (आघाडीसोबत जाण्याचा) असल्याचा सूचक इशारा शिवसेनेच्या नेत्यांनी दिला आहे.
जर प्रत्यक्षात शिवसेनेने आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर, त्यासाठी फडणवीस यांनी आपला ‘बी’ प्लॅन तयार करून ठेवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेकडून तीन-चार वेळा निवडून आल्यानंतर सुद्धा मंत्रिपद न मिळालेल्या आमदारांचा एक गट फडणवीस यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आधी पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या विस्तारावेळी सुद्धा शिवसेनेच्या आमदारांचा एक गट मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याचे पाहायला मिळाला होता. त्यामुळे शिवसेनेने जर अधिकच दबाव भाजपवर आणला तर या आमदारांचा एक गट बाहेर पडून भाजपला पाठिंबा देऊ शकतो.
‘मातोश्री’वर झाली चर्चा
शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हायला हवा, अशी भूमिका घेऊन निवडून आलेल्या शिवसेनेच्या काही आमदारांनी शनिवारी उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेतली.पण याच मुद्द्यावर पक्षातील काही ज्येष्ठ आमदारांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महायुतीत निवडणूक लढवली असताना भाजपसोबतच जाणे योग्य राहणार असल्याचे स्पष्ट मत मांडले आहे.