जात-धर्म नव्हे तर शेतकरी-कष्टकरी धाेक्यात - बच्चू कडू 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 01:31 PM2024-05-04T13:31:54+5:302024-05-04T13:33:58+5:30

'निवडणुका आल्यावर जातीचे राजकारण मनात पेरले जाते'

When elections come, caste politics are sown in the mind says Bachu Kadu | जात-धर्म नव्हे तर शेतकरी-कष्टकरी धाेक्यात - बच्चू कडू 

जात-धर्म नव्हे तर शेतकरी-कष्टकरी धाेक्यात - बच्चू कडू 

शिराळा : आतंकवाद हा काेणत्या जाती-धर्मात नव्हे तर राजकीय पक्षाच्या राजकारणात वाढत आहे. देशात सर्वच राजकीय पक्ष, धर्म, जात धोक्यात आहे, असे सांगत आहेत. मात्र आज खऱ्या अर्थाने शेतकरी, मजूर, कष्टकरी वर्ग धोक्यात आहे, असे प्रतिपादन प्रहार संघटनेचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांनी केले.

शिराळा येथे शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बच्चू कडू बोलत होते. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, जालिंदर पाटील, सौरभ शेट्टी, ‘प्रहार’चे तालुकाध्यक्ष बंटी नांगरे-पाटील, युवक क्रांतीचे निमंत्रक कैलास देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

बच्चू कडू म्हणाले, जात-धर्म यावर निवडणूक जिंकता येत नाही. आजकालचा राजकीय आतंकवाद शेतकऱ्यांच्या विरुद्ध आहे. राजकीय नेते गुलाम आहेत. त्यांची उमेदवारी दिल्लीत ठरते. मात्र शेट्टी यांची उमेदवारी लोकांमधून आहे. राममंदिर झाले, ही चांगली गोष्ट आहे. मात्र रामभक्त शेतकरी घरात पाय घासून मरत आहेत. राहुल गांधी युवक, महिलांना एक लाख रुपये देणार म्हणताहेत. पण ते देणार कोठून? देशाचा अर्थसंकल्प ४५ लाख कोटींचा आहे. त्यात देशातील ६० कोटी शेतकऱ्यांसाठी २० हजार कोटी, तर २० लाख नोकरांसाठी २० लाख कोटींची तरतूद अशी दुरवस्था आहे. निवडणुका आल्यावर जातीचे राजकारण मनात पेरले जाते. मात्र शेतकऱ्यांसाठी लढणारे कोणी नाही.

राजू शेट्टी म्हणाले, साखर कारखान्यांच्या कर्जास सरकार हमी देते. तेच सरकार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जास का हमी देत नाही. थकीत ऊस बिले मिळण्यासाठी मी मैदानात आहे. कारखानदाराच्या उरावर बसून पैसे मिळवून देणार आहे.

Web Title: When elections come, caste politics are sown in the mind says Bachu Kadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.