Kolhapur: गव्याची कारला धडक; राधानगरी येथे तिघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 03:48 PM2024-05-13T15:48:17+5:302024-05-13T15:48:39+5:30
गव्यांचे हल्ले रोखण्यासाठी वनविभागाकडून ठोस उपाय योजनाची गरज
गौरव सांगावकर
राधानगरी : निपाणी-देवगड राज्यमार्गावर राधानगरी पासून हाकेच्या अंतरावर सांगावकर मळ्या समोर सकाळच्या सुमारास बिथरलेल्या गव्याने अचानकपणे कोकणाकडे जाणाऱ्या कारला जोराची धडक दिली. या धडकेमध्ये कारमधील तिघेजण जखमी झाले. निलेश अर्जुन मर्गज (रा. सिंधुदुर्ग), महेश श्रीकांत पाटील, आकाश महेश पाटील (दोघे रा. कोल्हापूर) अशी जखमीची नावे आहेत. या धडकेत कारचे मोठे नुकसान झाले.
निलेश मर्गज, महेश पाटील, आकाश पाटील हे तिघे गाडी क्रमांक (एम एच ०९ जीएम ०७६२)मधून कोकणात निघाले होते. दरम्यान, राधानगरी पासून हाकेच्या अंतरावर सांगावकर मळ्यासमोर गव्याने त्यांच्या कारला जोराची धडक दिली. धडकेत कारमधील तिघे जखमी झाले तर गाडीचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळी वनपाल सूर्यकांत गुरव यांनी भेट देऊन जखमींना राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
वनविभागाकडून ठोस उपाय योजनेची गरज
या आधी ही गव्यांच्या हल्ल्यात अनेक शेतकरी जखमी झाल्याच्या घटना या परिसरात घडल्या आहेत. राधानगरी तहसील कार्यालया पासून हाकेच्या अंतरावर हा मळा आहे. या परिसरात मानवी वस्तीत गव्याचा वावर असतो. गव्यांकडून वारंवार हल्ले होत असतात. हे हल्ले थांबविण्याकरीता वनविभागा कडून ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे. जंगलातील पाणवटे आटले आहेत. उन्हामुळे पाण्याच्या शोधात गवे मानवी वस्तीत येतात. मोठया प्रमाणात शेतीचे नुकसान होत आहे. स्थानिक शेतकऱ्यांबरोबर आत्ता पर्यटकांना देखील गव्यांच्या हल्ल्याला सामोरे जावे लागत आहे.