आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करा: संजीवकुमार झा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 02:27 PM2019-10-04T14:27:23+5:302019-10-04T14:29:48+5:30
कोल्हापूर : सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक पुस्तकाचा सातत्याने वापर करावा; कारण निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती त्यामध्ये ...
कोल्हापूर : सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक पुस्तकाचा सातत्याने वापर करावा; कारण निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती त्यामध्ये दिली आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात कडक कारवाई करा, असे निर्देश सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक संजीवकुमार झा यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात आयोजित सर्व निवडणूक निर्णय अधिकारी आणि नोडल अधिकारी यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक विकासकुमार आरोरा, संजीव सिंग, बाबू लाल मीना, अमर नाथ तलवदे, सुरेंद्र राम, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, आदी प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी देसाई यांनी विधानसभा निवडणूक तयारीचे संगणकीय सादरीकरण केले. निवडणुकीसाठी आवश्यक ते सर्व प्रशिक्षण झाले असून, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी सज्ज आहेत. त्याचबरोबर आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी सर्व यंत्रणाही सतर्क असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
यावर विधानसभा निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात कडक कारवाई करा, असे निर्देश संजीवकुमार झा यांनी दिले.