बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; कोल्हापूरसह पुण्यातील सात जणांना अटक, प्रिंटरसह अन्य साहित्य जप्त

By उद्धव गोडसे | Published: April 10, 2024 03:58 PM2024-04-10T15:58:53+5:302024-04-10T15:59:22+5:30

लाखो रुपयांच्या बनावट नोटा खपवल्याचा संशय

Seven people from Kolhapur and Pune arrested in the gang that printed fake notes | बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; कोल्हापूरसह पुण्यातील सात जणांना अटक, प्रिंटरसह अन्य साहित्य जप्त

बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; कोल्हापूरसह पुण्यातील सात जणांना अटक, प्रिंटरसह अन्य साहित्य जप्त

कोल्हापूर : बनावट नोटा छापून त्या चलनात आणणाऱ्या रॅकेटचा शाहूपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी कोल्हापूर, कराड आणि पुण्यातील सात जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून नोटा छापण्यासाठी वापरलेला प्रिंटर, कागद, लॅपटॉप, वाहने असे साहित्य जप्त केले. ताराराणी चौकातील खासगी सावकाराच्या मुलाचाही यात समावेश आहे. मित्राला मदत करण्यासाठी आणि चैनीसाठी पैसे उपलब्ध व्हावेत, यासाठी बनावट नोटा छापल्याची कबुली त्यांनी पोलिसांकडे दिली.

राजारामपुरी येथील एका एटीएम सेंटरच्या डिपॉझिट मशीनमध्ये ५०० रुपयांच्या २० बनावट नोटा जमा झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. २८ मार्चला घडलेल्या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन शाहूपुरी पोलिसांनी तपास केला. बनावट नोटा जमा झालेले खाते नवी मुंबईतील एका व्यक्तीचे होते. मात्र, कोल्हापुरातील मित्राने त्याच्या खात्यावर पैसे जमा केले होते. डिपॉझिट मशीनमध्ये पैसे जमा करणाऱ्या संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला.

बनावट नोटा पुणे आणि कराड येथील तरुणांकडून मिळाल्याचे समजताच पोलिसांनी छापेमारी करून संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील प्रिंटर, कागद, लॅपटॉप, कटर आणि काही बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या. सातही जणांची पोलिस कोठडीत रवानगी झाली असून, त्यांच्या अधिक चौकशीत रॅकेटची व्याप्ती समोर येण्याची शक्यता निरीक्षक अजय सिंदकर यांनी व्यक्त केली.

यांना केली अटक

रोहन तुळशीराम सूर्यवंशी (वय २४, रा. गडमुडशिंगी, ता. करवीर), कुंदन प्रवीण पुजारी (वय २३, रा. विचारे माळ, कोल्हापूर), ऋषिकेश गणेश पास्ते (वय २३, रा. गंगावेश, कोल्हापूर), अजिंक्य युवराज चव्हाण (वय २६, रा. कळाशी, ता. इंदापूर, जि. पुणे), केतन जयवंत थोरात-पाटील (वय ३०, सध्या रा. पिंपरी, पुणे, मूळ रा. ओंड, ता. कराड, जि. सातारा), रोहित तुषार मुळे (वय ३३, रा. मलकापूर, ता. कराड) आणि आकाश राजेंद्र पाटील (वय २०, सध्या रा. पिंपरी, पुणे, मूळ रा. काले, ता. कराड) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. यातील दोघे सिव्हिल इंजिनिअर आहेत. एकाने बीटेक केले आहे. एक बीबीएच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. नोटांचे डिझायनिंग आणि छपाई करणारा रोहित याने कमर्शियल आर्टचे शिक्षण घेतले आहे. तर अजिंक्य हा कायद्याच्या पदवीचे शिक्षण घेत आहे.

अशा आणल्या बनावट नोटा

कर्जाचा बोजा वाढल्याने रोहन सूर्यवंशी हा पैशांच्या शोधात होता. इंदापुरातील मित्र अजिंक्य चव्हाण याने त्याला बनावट नोटा घेऊन कर्जाची परतफेड करण्याचा मार्ग सुचवला. त्यासाठी त्याने पुण्यातील केतन थोरात-पाटील याचा मोबाइल नंबर दिला. बनावट नोटा आणण्यासाठी रोहन याने पुजारी आणि पास्ते यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये घेतले.

त्यानंतर त्याने पुण्यात जाऊन केतन याच्याकडून दहा हजारांच्या बदल्यात २५ हजारांच्या बनावट नोटा आणल्या. त्यातील प्रत्येकी १२ हजार रुपये पुजारी आणि पास्ते यांना दिले. स्वत:कडे ठेवलेले एक हजार रुपये खर्च केले. पास्ते याने दहा हजारांच्या बनावट नोटांसह एकूण ५० हजार रुपये दरमहा १४ टक्के व्याजाने एका व्यक्तीला दिले. ते पैसे डिपॉझिट मशीनमध्ये भरल्यानंतर बनावट नोटांचा प्रकार समोर आला. पोलिसांच्या तपासात बनावट नोटांची मागणी करणाऱ्यांपासून ते पोहोचवणारी साखळी उलगडली. डिपॉझिट मशीनमध्ये नोटा भरणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी या गुन्ह्यात साक्षीदार बनवले आहे. त्याला बनावट नोटांची काहीच कल्पना नव्हती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Seven people from Kolhapur and Pune arrested in the gang that printed fake notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.