वस्त्रोद्योगासाठी खूशखबर, जुन्या दरानेच वीज बिल घेणार; मंत्री अस्लम शेख यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 05:10 PM2022-02-06T17:10:23+5:302022-02-06T17:13:01+5:30
वस्त्रोद्योग टिकला पाहिजे, यासाठी नेहमीच प्रयत्नशील असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू
इचलकरंजी : राज्यातील कोणत्याही यंत्रमागधारकांचा एकही पैसा वाया जाणार नाही. यंत्रमागधारकांच्या हितासाठी २७ अश्वशक्तीवरील वीज दर सवलतीसाठी आॅनलाईन नोंदणीस स्थगिती देण्यात येत असून जुन्या दरानेच वीज बिल घेण्यात येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी जाहीर केला.
शहरातील वस्त्रोद्योग व्यवसायातील अडचणी समजून घेण्यासाठी आले असता त्यावेळी ते बोलत होते. वस्त्रोद्योग टिकला पाहिजे, यासाठी नेहमीच प्रयत्नशील असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री सतेज पाटील यांनी, वस्त्रोद्योगाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी निश्चित प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. तसेच वस्त्रोद्योगासंबंधी सर्व विषय मार्गी लावण्याची मंत्री शेख यांना विनंती केली.
खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, राजूबाबा आवळे यांनीही वस्त्रोद्योगाच्या भविष्याचा विचार करून योग्य तो निर्णय घेण्याची विनंती केली. तसेच विनय महाजन, राजगोंडा पाटील, सतीश कोष्टी यांनी वस्त्रोद्योगासंबंधी आपल्या व्यथा मांडल्या. या बैठकीकडे सर्व शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले होते.
यावेळी अशोक स्वामी, राहुल आवाडे, राहुल खंजिरे, शशांक बावचकर, मदन कारंडे, रवींद्र माने, सागर चाळके, उपस्थित होते.