Kolhapur आईनेच एका वर्षाच्या लेकीला एक लाखात गोव्यात विकले, महिलेसह तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 04:51 PM2024-04-18T16:51:43+5:302024-04-18T16:52:00+5:30

मुलांचा ताबा मिळावा

Kolhapur mother sold one year old girl for Rs 1 lakh in Goa, three arrested including woman | Kolhapur आईनेच एका वर्षाच्या लेकीला एक लाखात गोव्यात विकले, महिलेसह तिघांना अटक

Kolhapur आईनेच एका वर्षाच्या लेकीला एक लाखात गोव्यात विकले, महिलेसह तिघांना अटक

कोल्हापूर : कौटुंबीक वादातून पतीपासून वेगळी राहणाऱ्या महिलेने मित्राच्या मदतीने तिची एक वर्षाची मुलगी गोव्यातील दाम्पत्याला एक लाखात विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत मुलीचे वडील दिलीप विलास ढेंगे (वय ३०, रा. इंगळी, ता. हातकणंगले) यांनी बुधवारी (दि. १७) पहाटे लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पाच जणांवर गुन्हा दाखल झाला. यातील महिलेसह तिचा मित्र आणि मुलगी विकण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.

मुलीची आई पुनम दिलीप ढेंगे (वय २५, मूळ रा. इंगळी, सध्या रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले), तिचा मित्र सचिन आण्णाप्पा कोंडेकर (वय ४०, रा. शहापूर, इचलकरंजी), मध्यस्थी करणारा किरण गणपती पाटील (वय ३०, रा. केर्ली, ता. करवीर) आणि गोव्यातील दाम्पत्य फातिमा फर्नांडिस व जेरी पॉल नोऱ्होन्हा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मुलगी अजूनही गोव्यातील दाम्पत्याकडेच असून, त्यांच्याशी संपर्क साधला आहे. ते स्वत:हून न आल्यास पोलिस तिथे जाऊन मुलीचा ताबा घेणार आहेत.

लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी दिलीप आणि पुनम यांचे २०१८ मध्ये लग्न झाले. त्यांना तीन वर्षांचा एक मुलगा आणि एक वर्षाची मुलगी आहे. कौटुंबीक वादामुळे गेल्या वर्षभरापासून पुनम ही पट्टणकोडोली येथे तिच्या आईकडे राहते. १३ एप्रिलला फिर्यादी दिलीप यांना त्यांच्या सासूचा फोन आला. पुनम हिने लहान मुलगी कोणाला तरी दत्तक दिली असून, तुम्ही येऊन चौकशी करा, असे त्यांनी सांगितले.

त्यानुसार दिलीप यांनी पट्टणकोडोली येथे जाऊन चौकशी केली असता, सध्या पत्नी पुनम इचलकरंजीत सचिन कोंडेकर या मित्राकडे राहत असल्याचे समजले. तिथे जाऊन चौकशी केली असता, तिने मुलीला आष्टा (जि. सांगली) येथील पाळणाघरात ठेवल्याचे सांगितले. तिला आत्ताच्या आत्ता भेटायचे असल्याचा आग्रह धरल्यामुळे अखेर तिने मुलीला गोव्यातील दाम्पत्याकडे विकल्याचे सांगितले. ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी केल्याचेही तिने दाखवले.

हुपरी पोलिसांनी लक्ष्मीपुरीत पाठवले

मुलीची विक्री झाल्याचा प्रकार लक्षात येताच दिलीप याने हुपरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत करवीर तहसीलदार कार्यालयाच्या आवारात नोटरी झाल्याने पोलिसांनी ढेंगे यांना लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. ढेंगे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करून तातडीने तिघांना अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक रुपाली पाटील अधिक तपास करीत आहेत.

मुलांचा ताबा मिळावा

पुनम हिने एक लाख रुपये घेऊन त्याबदल्यात पोटच्या मुलीला विकले. या व्यवहारात तिला मित्र सचिन कोंडेकर याने मदत केली. तीन वर्षांचा मुलगा सध्या तिच्याजवळ आहे. विकलेल्या मुलीचा आणि तीन वर्षांच्या मुलाचा ताबा मिळावा, अशी मागणी फिर्यादी दिलीप यांनी केली आहे.

Web Title: Kolhapur mother sold one year old girl for Rs 1 lakh in Goa, three arrested including woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.