कोल्हापूर जिल्ह्यातील खरीप क्षेत्र ४ हजारांनी कमी, ऊस १६ हजार हेक्टरने वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 01:07 PM2024-05-14T13:07:38+5:302024-05-14T13:08:09+5:30

कडधान्याला दर नसल्याचा परिणाम : मान्सूनचे वेळेवर आगमन; शेतकऱ्यांची लगबग वाढली

Kharif area in Kolhapur district decreased by 4 thousand, sugarcane increased by 16 thousand hectares | कोल्हापूर जिल्ह्यातील खरीप क्षेत्र ४ हजारांनी कमी, ऊस १६ हजार हेक्टरने वाढले

कोल्हापूर जिल्ह्यातील खरीप क्षेत्र ४ हजारांनी कमी, ऊस १६ हजार हेक्टरने वाढले

कोल्हापूर : गेल्या पाच-सहा वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील खरिपाचे क्षेत्र हळूहळू कमी होऊ लागले आहे. खरिपात घेण्यात येणाऱ्या अन्नधान्य व कडधान्याच्या बेभरवशाच्या दरामुळे शेतकऱ्यांची मानसिकता बदलली आहे. त्या तुलनेत उसाला चांगला भाव मिळू लागल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील खरिपाचे क्षेत्र ४ हजार हेक्टरने कमी झाले, तर उसाचे क्षेत्र तब्बल १६ हजार हेक्टरने वाढले आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र हे ७ लाख ७६ हजार हेक्टर आहे. त्यापैकी ५ लाख ७ हजार हेक्टर हे लागवडीलायक आहे. निव्वळ पेरा क्षेत्र ४ लाख ७७ हजार हेक्टर आहे. खरीप हंगामात भात, ज्वारी, नागली, साेयाबीन, भुईमूग, तूर, मूग, उडीद ही पिके घेतली जातात. खरिपात सर्वाधिक भात पीक हे ९२ हजार हेक्टरवर घेतले जाते. त्यापाठोपाठ सोयाबीन, भुईमूग या तेलबियांचे उत्पादन घेतले जाते.

मात्र, गेल्या दोन वर्षांत सोयाबीनच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. खाद्यतेलाच्या दरात घसरणीमुळे भुईमुगालाही अपेक्षित दर मिळाला नाही. त्या तुलनेत उसाला बऱ्यापैकी तेही एकरकमी दर मिळत असल्याने उसाचे क्षेत्र वाढले आहे.

अक्षय तृतीया झाल्याने खरीप तयारीसाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. त्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून वळीव पाऊस जोरदार कोसळत असल्याने मशागतीला मदत होत आहे. (पूर्वार्ध)

घरी खाण्यापुरता भात पिकविण्याकडे कल

भाताचा उत्पादन खर्च आणि काढणीनंतर बाजारातील दर पाहता, शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही. त्यामुळे अलीकडील चार-पाच वर्षांत घरी खाण्यापुरताच भात पिकविण्याकडे बहुतांशी शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

तुलनात्मक पीक क्षेत्रातील घट-वाढ हेक्टरमध्ये -

पीक             २०२२-२३                    २०२३-२४
खरीप          १ लाख ९६ हजार ४६६  १ लाख ९२ हजार ६३६
रब्बी            २२ हजार ७०                 २१ हजार ०७
ऊस             १ लाख ७२ हजार ४६३  १ लाख ८८ हजार ४५९

गेल्या पाच वर्षांतील पर्जन्यमान मिली मीटरमध्ये असे-
वर्ष                 पाऊस          टक्के

२०१९             २३८८             १२८
२०२०             १९४४             ९९
२०२१             २११९             १२४
२०२२             १९३२             ९८
२०२३             ११०३             ५६

मान्सूनचे आगमन; पेरणी अशी करा..

यंदा मान्सूनचे आगमन जूनच्या पहिल्या आठवड्यात होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यानुसार खरिपाच्या पेरणीचे नियोजन करावे. मध्यम खोल प्रमाणात भाताची धूळवाफ पेरणी, तर पाऊस सुरु झाल्यानंतर सोयाबीन, भुईमुगाची खोलवर पेरणी करावी.

Web Title: Kharif area in Kolhapur district decreased by 4 thousand, sugarcane increased by 16 thousand hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.