भाजपकडे भ्रष्टाचाऱ्यांच्या वॉशिंग मशीनची गॅरंटी, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचा घणाघात 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 12:10 PM2024-04-30T12:10:25+5:302024-04-30T12:11:18+5:30

'चहा तिसऱ्यांदा कडवला की विष बनते'

BJP guarantee of washing machines of corrupt officials, Congress spokesperson Sachin Sawant attack | भाजपकडे भ्रष्टाचाऱ्यांच्या वॉशिंग मशीनची गॅरंटी, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचा घणाघात 

भाजपकडे भ्रष्टाचाऱ्यांच्या वॉशिंग मशीनची गॅरंटी, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचा घणाघात 

कोल्हापूर : महागाईने जनता प्रचंड त्रस्त असून भाजपविरोधात देशभरात मोठी लाट आहे; मात्र भाजपचे नेते मात्र खोटी गॅरंटी देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत. यांच्याकडे विकासाची नव्हे तर भ्रष्टाचारी, गुंड यांना स्वच्छ करणाऱ्या वॉशिंग मशीनची गॅरंटी असल्याचा घणाघात काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोमवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केला. चहा तिसऱ्यांदा कडवला की त्याचे विष बनते या शब्दांत त्यांनी केंद्र सरकारची खिल्ली उडवली.

सावंत म्हणाले, महागाईने लोकांचे जीवन असह्य झाल्याने जनतेमध्येच भाजपविरोधात नाराजी आहे. त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याने त्यांनी धर्माच्या आधारावर निवडणूक नेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. धार्मिक ध्रुवीकरण हे त्यांचे शेवटचे अस्त्र आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील लहान सहान चुकीच्या गोष्टी शोधणारे भाजपवाले आमच्या जाहीरनाम्याचे प्रचारक बनल्याचा टोला लगावत राज्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विमानतळाचे श्रेय घेणाऱ्यांनी भूसंपादनासाठी काय केले ?

कोल्हापुरात महायुतीचा एक राज्यसभेचा तर दोन लोकसभेचे खासदार आहेत. या तिघांनी जिल्ह्यात एक तरी मोठा उद्योग आणला का ?, शाहू मिल यांना माहीत तर आहे का ? असा सवाल करत या तिन्हीही लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यात एक रुपयाचाही निधी आणला नसल्याचा आरोप सावंत यांनी केला. विमानतळाचे श्रेय घेणाऱ्यांनी भूसंपादनासाठी काय केले असा सवालही त्यांनी केला.

पवार, शिंदे नेस्तनाबूत होतील

एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे उमेदवारही भाजपच ठरवत आहे. त्यांना हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या जागा दिल्या आहेत. निवडणूक झाली की दोन्ही नेते नेस्तनाबूत होतील असा दावाही सावंत यांनी केला.

Web Title: BJP guarantee of washing machines of corrupt officials, Congress spokesperson Sachin Sawant attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.