आई अंबाबाईचे मुखकमल झाले पूर्ववत सुंदर

By इंदुमती सूर्यवंशी | Published: April 16, 2024 07:59 PM2024-04-16T19:59:43+5:302024-04-16T20:00:05+5:30

भाविकांची गर्दी : देवीच्या मुळ मुर्तीचे दर्शन सुरु.

Ambabais face became beautiful again | आई अंबाबाईचे मुखकमल झाले पूर्ववत सुंदर

आई अंबाबाईचे मुखकमल झाले पूर्ववत सुंदर

कोल्हापूर : दोन दिवसांच्या संवर्धन प्रक्रियेनंतर मंगळवारपासून करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन पुर्ववत सुरू झाले. यानिमित्त भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. मूर्तीचा चेहरा आणि किरीटाकडील भागावरच ही तातडीची संवर्धन प्रक्रिया झाली असून त्यामुळे अंबाबाई मूर्तीचे मुखकमल पूर्ववत सुंदर झाले आहे.

श्री अंबाबाई मूर्तीची प्रचंड झीज झाल्याचा अहवाल तज्ञांनी दिल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तातडीने केंद्रीय पुरातत्व खात्याच्या वरीष्ठांकडे पाठपुरावा करून मूर्तीच्या संवर्धनासाठी पावले उचलली. त्यानुसार पुरातत्व रसायनतज्ञ विभागाचे उपअधीक्षक डॉ. एस. विनोद कुमार, वरिष्ठ प्रतिमाकार सुधीर वाघ, प्रतिमाकार मनोज सोनवणे यांनी रविवारी व सोमवारी संवर्धन प्रक्रिया पूर्ण केली. सोमवारी सायंकाळी ही प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळे देवस्थान समितीचे मंगळवारी सकाळी देवीची मूळ मूर्ती पुजाऱ्यांकडे दिली. मूळ मूर्तीत पून्हा प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सकाळी ७ वाजल्यापासून धार्मिक विधी सुरू झाले. सकाळी साडे अकरा वाजता हे सर्व विधी पूर्ण झाले. त्यानंतर मूळ मूर्तीचे भाविकांना दर्शन सुरू झाले. गेल्या दाेन दिवसांपासून उत्सवमूर्तीच्या दर्शनावर समाधान मानलेल्या भाविकांनी मंगळवारी मंदिरात मोठी गर्दी केली होती.

सुनावणी २३ तारखेला
मूर्तीच्या संवर्धनाबाबत दिवाणी न्यायालयात दावा सुरु आहे. मात्र तोपर्यंत वेळ दवडण्यात अर्थ नव्हता त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने मूर्तीच्या सर्वाधिक नाजूक झालेल्या भागाचे संवर्धन करून घेतले आहे. न्यायालयात पुढील सुनावणी २३ तारखेला होणार आहे. त्यावेळी काय निर्णय होतो हे पाहणे औत्सूक्याचे आहे.

Web Title: Ambabais face became beautiful again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.