महापारेषणच्या २२० KV जांभूळ अतिउच्चदाब उपकेंद्राचा पहिला टप्पा कार्यान्वित

By अनिकेत घमंडी | Published: May 6, 2024 02:50 PM2024-05-06T14:50:44+5:302024-05-06T14:51:12+5:30

वडवली आणि आंबेशिव उच्चदाब वाहिन्यांमधून वीजुपरवठ्याला सुरुवात 

First phase of 220 KV Jambhul Ultra High Pressure Substation of Mahapareshan commissioned | महापारेषणच्या २२० KV जांभूळ अतिउच्चदाब उपकेंद्राचा पहिला टप्पा कार्यान्वित

महापारेषणच्या २२० KV जांभूळ अतिउच्चदाब उपकेंद्राचा पहिला टप्पा कार्यान्वित

डोंबिवली: महापारेषणच्या २२०/२२ केव्ही जांभूळ अतिउच्चदाब उपकेंद्राचा पहिला टप्पा ४ मे रोजी कार्यान्वित करण्यात आला आहे. यात ५० एमव्हीए क्षमतेचा पहिला ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित झाला असून वडवली व आंबेशिव या दोन २२ केव्ही उच्चदाब वाहिन्यांमधून सुरळीतपणे वीजपुरवठा सुरू करण्यात यश आले.

परिणामी महापारेषणच्या १००/२२ मोरीवली उपकेंद्रावरील भार कमी होऊन महावितरणच्या बदलापूर, अंबरनाथ, कानसाई आणि कात्रपमधील ग्राहकांना दिलासा मिळाल्याचा दावा महावितरणने केला. जांभूळ उपकेंद्रात ५० एमव्हीए क्षमतेचे दोन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार आहेत. यातील पहिला ट्रान्सफॉर्मर शनिवारी कार्यान्वित करण्यात आला. या उपकेंद्रातून निघणाऱ्या चारपैकी वडवली आणि आंबेशिव या उच्चदाब वीजवाहिन्यांही शनिवारीच कार्यान्वित करण्यात आल्या.

या भागाला वीजपुरवठा करणाऱ्या मोरीवली १००/२२ केव्ही उपकेंद्राचा भार जवळपास २५० अँपियरने कमी झाला. त्यामुळे वाढते तापमान आणि रात्रीच्या वेळी विजेची मागणी वाढल्यानंतर १००/२२ मोरीवली उपकेंद्रावरील भार कमी करण्याची महापारेषणकडून होणारी मागणी संपुष्टात आली आहे. मोरीवली उपकेंद्रावरील भार कमी झाल्यामुळे विजेच्या अधिक मागणीच्या कालावधीत बदलापूर, अंबरनाथ, कानसाई आणि कात्रप परिसरातील ग्राहकांचा बाधित होणारा वीजपुरवठा यापुढे सुरळीतपणे सुरू राहणार आहे. कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांनी महापारेषणकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे २२०/२२ केव्ही जांभूळ अतिउच्चदाब उपकेंद्राचा पहिला टप्पा विजेची मागणी वाढलेल्या कालावधीत कार्यान्वित होऊ शकला. यात महापारेषणकडून मिळालेले सहकार्य महत्वाचे आहे. 

Web Title: First phase of 220 KV Jambhul Ultra High Pressure Substation of Mahapareshan commissioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.