उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल

By विलास बारी | Published: May 8, 2024 12:46 AM2024-05-08T00:46:14+5:302024-05-08T00:46:47+5:30

भुसावळच्या सभेत फडणवीसांनी घेतला उद्धव ठाकरेंच्या विधानाचा समाचार

Uddhav Thackeray Kafanchor will you respond to him Question of Devendra Fadnavis to voters in Jalgaon Raksha Khadse | उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल

उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल

विलास बारी, भुसावळ, जि.जळगाव: ‘निवडणूक निकालानंतर भाजपवाल्यांना बिळातून बाहेर काढून त्यांचा समाचार घेऊ, अशी वल्गना करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना घरात बसून काम पाहिले. ते स्वत: बिळातून बाहेर आले नाहीत. कोविडच्या काळातही भ्रष्टाचार केला. अशा खिचडीचोर आणि कफनचोरांना तुम्ही प्रतिसाद देणार का,’ असा थेट प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे मंगळवारी जाहीर सभेत मतदारांना विचारला.

रावेर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ  मातृभूमी चौकात आयोजित सभेत त्यांनी उद्धव ठाकरे, तसेच इंडिया आघाडीवर कडाडून टीका केली.

ते म्हणाले की, इंडिया आघाडी म्हणजे डबे नसलेली गाडी आहे. एकीकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात २४ पक्षांची खिचडी आहे. दुसरीकडे मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाची भक्कम गाडी धावतेय.  राहुल गांधी म्हणतात, मी इंजिन, उद्धव म्हणतात मी इंजिन, शरद पवार म्हणतात, मी इंजिन! इंडिया आघाडीतील सर्वचजण इंजिन बनू पाहत आहे. या सर्वांच्या इंजिनमागे सामान्यांसाठी डबाच नाही व जागाही नाही; मात्र मोदींच्या इंजिनाला डबे असून, सर्वसामान्यांना घेऊन ते देशाचा विकास करीत आहे, असेही फडणवीस म्हणाले.

आम्ही उज्ज्वल निकमांच्या बाजूने!

विरोधकांकडून ॲड. उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीबाबतही टीका केली जात आहे; परंतु कसाबची बाजू घेणारे हे कसाबसोबत आहेत. आम्ही निकम यांच्यासोबत असून योग्य व्यक्तीला उमेदवारी दिल्याचेही फडणवीस म्हणाले.

Web Title: Uddhav Thackeray Kafanchor will you respond to him Question of Devendra Fadnavis to voters in Jalgaon Raksha Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.