अमळनेर तालुक्यात दीड तास अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 11:35 PM2019-09-09T23:35:49+5:302019-09-09T23:44:32+5:30
पाडळसरे-कळमसरेसह बोहरे परिसरात व संपूर्ण अमळनेर तालुक्यात सोमवारी सायंकाळी सहाला पावसाने जोरदार हजेरी लावली.
अमळनेर, जि.जळगाव : पाडळसरे-कळमसरेसह बोहरे परिसरात व संपूर्ण अमळनेर तालुक्यात सोमवारी सायंकाळी सहाला पावसाने जोरदार हजेरी लावली. ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. यात अनेक शेतांचे बांध व जलसंधारणची कामे फुटून शेतीसह पिकांना मोठा फटका बसला असून मोठे नुकसान झाले, तर पाडळसरे-कळमसरेसह बोहरे या तिन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. निम, तांदळी, बोहरे या गावांना जाणाºया रात्रीच्या बसेस मारवड येथे थांबून आहेत. त्यामुळे अनेक महिला व प्रवासी रस्त्यातच ताटकळत बसले असल्याने वाहक व चालकही थांबून आहेत.
या घटनेची माहिती अमळनेरच्या तहसीलदार यांना कळमसरे पाडळसरे येथील पत्रकारांनी दिली असता अमळनेर पालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान व तीन बंब घेऊन रवाना झाले. प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार ज्योती देवरे, मारवडचे मंडळ अधिकारी बी.आर.शिंदे, तलाठी गौरव शिरसाठ हे दाखल झाले. घरे कोसळलेल्या कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन करून कळमसरे पाडळसरे येथील ग्रामस्थांची भेट देऊन धीर दिला व प्रशासन आणि यंत्रणा आपल्यासोबत असल्याने घाबरून जाऊ नये. अफवांवर विश्वास ठेवू नये म्हणून जागृत केले. कळमसरे पाडळसरे येथे सात आठ घरे कोसळले. त्यात मात्र जीवित हानी झाली नाही. सखल शेतीत पाणी तुडुंब भरल्याने पिके पाण्याखाली आली आहेत.
पाडळसरे, बोहरे, कळमसरेसह परिसरातील गावांच्या संपर्क तुटला आहे. गावातील अनेक घरात पावसाचे पाणी आत शिरले आहे. कळमसरे भिलाटी, दुर्गानगर प्लॉटिंग येथे पावसाचे पाणी घरात शिरले आहे. मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. जवळपास डझनभर घरे ही पावसाच्या पाण्याने पडली आहे. कळमसरे गावाला पावसाच्या पाण्याचा संपूर्ण वेढा असल्याने अमळनेर-शिरपूर बसही कळमसरे-शाहपूर रस्त्यावर उशिरापर्यंत उभी होती. तसेच अमळनेर-निम बस ही पाण्यात अडकली आहे. अचानक जणू काही ढगफुटी झाली की काय, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. या पावसाने संपूर्ण शेती ही पाण्याखाली आली आहे. कपाशी, मका, ज्वारी, बाजरीसह इतर पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ग्रामस्थानी नुकसान भरपाईची मागणी करीत, शेतीच्या पंचनामा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनीे तहसीलदार व प्रांत अधिकाºयांकडे केली आहे.
तीन घरे पडली
कळंबे गावात पण पावसाच्या पाण्याने तीन घरे पडली. त्यात गोरख बुधा पारधी, राजकोरबाई कौतिक शिरसाठ व अशोक देवीदास पारधी यांचा समावेश आहे.