पाकमध्ये शरीफ-भुत्तो यांचे सरकार?; हातमिळवणीस इम्रान यांचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 05:44 AM2024-02-14T05:44:40+5:302024-02-14T05:46:06+5:30

पीएमएल-एन, पीपीपी व मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट (एमक्यूएम) सोबत कोणतीही चर्चा होणार नाही

Sharif-Bhutto Government in Pakistan?; Imran's refusal to shake hands | पाकमध्ये शरीफ-भुत्तो यांचे सरकार?; हातमिळवणीस इम्रान यांचा नकार

पाकमध्ये शरीफ-भुत्तो यांचे सरकार?; हातमिळवणीस इम्रान यांचा नकार

इस्लामाबाद : पाकिस्तानातील सत्तास्थापनेची कोंडी मंगळवारीही कायम होती. पीएमएल-एन आणि पीपीपी यांच्यात वाटाघाटी सुरू असताना इम्रान खान यांच्या पीटीआयने आघाडी सरकारची कल्पना फेटाळत प्रतिस्पर्धी पक्षांसोबत हातमिळवणीस नकार दिला आहे. त्यामुळे जे सरकार स्थापन होईल ते नवाज शरीफ व बिलावल भुत्तो झरदारी यांच्या पक्षांचे असेल हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. त्यातच माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आपले बंधू नवाज शरीफ विक्रमी चौथ्यांदा पंतप्रधान बनतील, या आपल्या दाव्याचा पुनरुच्चार केल्याने पडद्याआड बरेच काही घडल्याचे मानले जात आहे.

पीएमएल-एन आणि पीपीपी यांच्यामध्ये दोन दिवसांपासून वाटाघाटी सुरू आहेत. यादरम्यान माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांचे बंधू नवाज शरीफ चौथ्यांदा  पंतप्रधान होतील, असे म्हटले आहे. 

पीएमएल-एन, पीपीपी व मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट (एमक्यूएम) सोबत कोणतीही चर्चा होणार नाही; परंतु, इतर सर्व पक्ष आणि गटांशी आपण संपर्क साधणार आहोत.    - इम्रान खान, माजी पंतप्रधान

पाकमध्ये काय घडतंय? 
माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाज यांच्या विजयाला आव्हान देणाऱ्या पीटीआय पुरस्कृत अपक्ष उमेदवारांनी दाखल केलेल्या ३० हून अधिक याचिका लाहोर उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळल्या. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाने केंद्र आणि पंजाब आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतात सरकार स्थापन करण्याची रणनीती तयार करण्यासाठी समित्या स्थापन केल्या. बिलावल भुत्तो यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (पीपीपी) नेत्यांमध्ये आघाडी सरकारमध्ये सहभागी व्हायचे की विरोधी पक्षात बसायचे या मुद्द्यावर एकवाक्यता नाही.

Web Title: Sharif-Bhutto Government in Pakistan?; Imran's refusal to shake hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.