हिंगोलीत गिरीश महाजन ॲक्शन मोडवर; चार तासांपासून भाजप बंडखोरांची मनधरणी सुरू
By विजय पाटील | Published: April 7, 2024 06:23 PM2024-04-07T18:23:49+5:302024-04-07T18:24:11+5:30
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड व आ.श्रीकांत भारतीय हेदेखील आले.
- विजय पाटील/हिंगोली : लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजनहिंगोलीत दाखल झाले असून, दुपारी १ वाजेपासून बोलणी करीत आहेत. सायंकाळी पाचच्या सुमारास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड व आ.श्रीकांत भारतीय हेही आले असून यावर काहीतरी निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार देण्याची मागणी सर्व आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी केली होती. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही त्यांना वारंवार विश्वास देत ही जागा आपल्याला मिळू शकते, अशी आशा दाखविली होती. केंद्र व राज्यातील अनेक मंत्री, भाजप पदाधिकाऱ्यांनी लोकसभेचा प्रवास करून वातावरण निर्माण केले होते. मात्र ऐनवेळी शिंदे गटाकडे जागा जाण्याची चिन्हे दिसू लागल्याने भाजपच्या मंडळीने विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला.
हा उमेदवार असला तर बंडखोरी जड जाईल, याची जाणीव भाजपच्या मंडळीला होती. शिवाय जर पाटील यांना उमेदवारी दिली नाही तर आपोआपच भाजपमधील कुणाला तरी संधी शिंदे गटाकडून मिळेल, असेही वाटत होते. अन्यथा भाजपलाच जागा दिली जाईल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र शिंदे सेनेने नवा चेहरा देवून भाजपचीच जबाबदारी वाढविली. आता ती पेलणार नसल्याची शंका असेल म्हणून भाजपच्या मंडळीने बंडखोरीचे निशाण हाती घेतले आहे.
रामदास पाटील, शिवाजी जाधव व श्याम भारती या तिघांच्या बंडखोरीनंतर हा विषय राज्यभरात चर्चेत आला. भाजप व शिंदे सेनेत वितुष्ट येण्याची चिन्हे यामुळे निर्माण झाली आहेत. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी भाजपमध्ये संकटमोचक मानले जाणारे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना पाठविले आहे. दुपारी १ वाजेपासून ते आढावा घेत आहेत. हिंगोलीत मिलींद यंबल यांच्या निवासस्थानी आ.तान्हाजी मुटकुळे, आ.भीमराव केराम, माजी खा. शिवाजी माने, माजी आ. गजानन घुगे, फुलाजी शिंदे, बाबाराव बांगर, श्रीकांत चंद्रवंशी आदी मंडळी ठाण मांडून आहे. कुणाची भ्रमणध्वनीवर तर कुणाशी प्रत्यक्ष चर्चा केली जात आहे.
कराड व भारतीय दाखल
केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड आणि आ.श्रीकांत भारतीय हे हिंगोलीत सांयकाळी ५ वाजेच्या सुमारास दाखल झाले आहेत. तेही या चर्चेत सहभागी होवून नाराजांची मनधरणी करण्यासाठी सरसावले आहेत.