यंदा काजू उत्पादन ५० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता : दरातही घसरण काजू उत्पादक नुकसानीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 04:54 PM2024-03-28T16:54:03+5:302024-03-28T16:54:22+5:30
कृषी खात्यानुसार गेल्या वर्षी भरमसाठ काजूचे उत्पादन झाले होते. गेल्या वर्षी २२ हजार मेट्रिक टनपर्यंत काजूचे उत्पादन पाेहचले हाेते.
पणजी (नारायण गावस): यंदाचा काजू हंगाम हा शेतकऱ्यांसाठी खूपच नुकसानदायक ठरला असून यंदा ५० टक्के उत्पादन मिळणे कठीण झाले आहे. बदलत्या हवामानाचा काजू पिकावर परिणाम जाणवला त्यात दरातही कमतरता असल्याने शेतकरी पूर्णपणे नुकसानीत सापडला आहे.
कृषी खात्यानुसार गेल्या वर्षी भरमसाठ काजूचे उत्पादन झाले होते. गेल्या वर्षी २२ हजार मेट्रिक टनपर्यंत काजूचे उत्पादन पाेहचले हाेते. पण या हंगामात काजू उत्पादन १० हजार मेट्रिक टन हाेणेही कठीण झाले आहे. काही कलमी काजू लागले हाेते ते ही आता कमी झाले आहे. गावठी काजूला यंदा चांगला बहर आला नाही. तसेच दरही नसल्याने अनेक शेतकरी नुकसानीत सापडले आहेत.
सत्तरी पेडणे काणकोण या तालुक्यात अनेक शेतकरी काजू उत्पादनावर अवलंबून असतात. त्यांचे वार्षिक उत्पादन हे काजू पिकावर अवलंबून असते. काही जणांचा काजूच्या हंगामात ३ महिन्यात लाखो रुपयांचे उत्पादन केले जाते. पण मागील काही वर्षांपासून काजूचा दर खाली येत असल्याने शेतकऱ्यांना याचा बराच फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्चही उभा होत नाही.
काही वर्षापूर्वी काजूचा दर हा २०० रुपया प्रती किलो पर्यंत गेला होता. ताेच आता १११ रुपया प्रती किलाेवर आला आहे. काजू कारखानदार परदेशातील आफ्रिकन काजू आणत असल्याने स्थानिक काजू्ला दर दिला जात नाही. त्यामुळे सरकारने या आयात काजूवर आयात कर लागू करावा जेणे करुन हे कारखानदार बाहेरील काजू आणणार नाही. यामुळे आमच्या काजूला मागणी वाढणार असे काणकाेण येथील शेतकरी रामचंद्र गावकर यांनी सांगितले.
इतर भात शेती सोडून काजू उत्पादन केले आहे. सुरुवातीला चांगले पिक मिळाले आता उत्पादन घटले आहे आणि दरही कमी झाला आो. त्यामुळे कामगारांचा साफसफाईसाठी केलेला खर्चही उभा होत नाही त्यामुळे आता काजू बागायती करणे नकाे झाले आहे, असे सत्तरीतील उत्तम गावस या काजू बागायतदार शेतकऱ्यांने सांगितले.