अमित शाह यांच्या सभेला २५ हजार लोकांचे लक्ष्य: सदानंद तानावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2024 01:39 PM2024-05-02T13:39:53+5:302024-05-02T13:41:03+5:30

भाजपचा गोव्यासाठीचा जाहीरनामा गुरुवारी प्रसिद्ध केला जाणार आहे.

25 thousand people target for amit shah rally for lok sabha election 2024 said sadanand tanavade | अमित शाह यांच्या सभेला २५ हजार लोकांचे लक्ष्य: सदानंद तानावडे

अमित शाह यांच्या सभेला २५ हजार लोकांचे लक्ष्य: सदानंद तानावडे

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी सभेनंतर शुक्रवार दि. ३ रोजी म्हापशात होणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जाहीर सभेसाठी २५ हजार लोकांची उपस्थिती अपेक्षित असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिली. 

दरम्यान भाजपचा गोव्यासाठीचा जाहीरनामा गुरुवारी प्रसिद्ध केला जाणार आहे. येथील उत्तर गोवा पक्ष कार्यालयात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत पर्यटन मंत्री रोहन खंवटे, उपसभापती जोशुआ डिसोझा, आमदार केदार नाईक, दयानंद सोपटे, सिद्धार्थ  कुंकळ्ळेकर उपस्थित होते. सभा संध्याकाळी ५ वाजता सुरू होणार असल्याचे ते म्हणाले.

सांकवाळ येथे झालेली सभा ही दक्षिणेतील मतदारसंघासाठी घेण्यात आली होती, तर म्हापशातील सभा ही उत्तर गोवा मतदार संघासाठी असल्याचे तानावडे म्हणाले. पुढील दिवसांत कोपरा बैठका तसेच सभांवर भर दिला जाणार असल्याची माहिती यावेळी दिली. सभेत येणाऱ्या लोकांना अडचण होउ नये यासाठी योग्य व्यवस्था, स्क्रिन बसवल्या जाणार असल्याचेही सांगितले.

मतदान टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न

देशातील इतर राज्यात मतदानांची घटलेली टक्केवारीची पुनरावृत्ती गोव्यातही होऊ नये म्हणून योग्य खबरदारी पक्षाकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे किमान ७० टक्के मतदान करून घेण्यासाठी प्रयत्न पक्ष पातळीवर केले जात असल्याचे तानावडे म्हणाले.

विरोधकांकडे पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार नाही

यावेळी तानावडे यांनी विरोधकांवर टीका करताना पक्षाजवळ पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार नसल्याचे सांगितले. त्यामुळे विरोधक वर्षाला एक पंतप्रधान देशाला देणार का? असाही सवाल त्यांनी केला. उमेदवार नसल्याने विरोधकांकडे कोणतेच खास धोरणही दिसून येत नसल्याची माहिती यावेळी दिली. उलट भाजपने मागील १० वर्षे एकच पंतप्रधान देऊन विकास करून दाखवल्याचे ते म्हणाले.
 

Web Title: 25 thousand people target for amit shah rally for lok sabha election 2024 said sadanand tanavade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.