अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण अभियंता ठार, हेल्मेटचा भुगा, पाय धडावेगळा

By संजय तिपाले | Published: May 16, 2024 09:35 PM2024-05-16T21:35:02+5:302024-05-16T21:35:12+5:30

देसाईगंज येथील घटना, पित्याचा घातपाताचा आरोप

Young engineer killed in collision with unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण अभियंता ठार, हेल्मेटचा भुगा, पाय धडावेगळा

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण अभियंता ठार, हेल्मेटचा भुगा, पाय धडावेगळा

गडचिरोली: आरमोरीवरून देसाईगंजकडे निघालेल्या तरुण अभियंत्यास वडसा वनविभाग कार्यालयासमोर अज्ञात वाहनाने धडक दिली.ही धडक एवढी जबर होती की त्याचा उजवा पाय धडावेगळा झाला तर हेल्मेटचाही अक्षरश: भुगा झाला. ही हृदयद्रावक घटना १६ मे रोजी दुपारी ४ वाजता घडली.

श्रीकृष्ण राजकुमार वंजारी (२८,रा.पवनी जि.भंडारा) असे त्या दुर्दैवी अभियंत्याचे नाव आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे एका खासगी कंपनीत तो कार्यरत होता. १६ रोजी तो दुचाकीवरुन (एमएच ३६ एएम-७७२१) आरमोरी मार्गे देसाईगंजकडे ४ येत होता. दरम्यान, वडसा वन विभागाच्या उपविभागीय कार्यालयासमोर अज्ञात वाहनाने उजव्या बाजूने जबर धडक दिली. धडक एवढी भीषण होती की हेल्मेटचा भुगा झाला व त्याचा उजवा पाय धडावेगळा झाला. दुचाकीही फरफटत गेली. डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातस्थळापासून २५ ते ३० फूट अंतरावर त्याचा मृतदेह आढळला. देसाईगंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. अज्ञात वाहनचालकाचा शोध सुरु आहे.

पित्याचा घातपाताचा आरोप
श्रीकृष्ण वंजारी याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. या घटनेनंतर कुटुंबीयास धक्का बसला आहे. सेवानिवृत्त वडील राजकुमार वंजारी यांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सर्व बाजूंनी तपास केला जाईल, असे पोलिस निरीक्षक अजय जगताप यांनी सांगितले.

Web Title: Young engineer killed in collision with unknown vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.