बनावट सुगंधी तंबाखू विक्रीतून आरमोरीत लाखोंची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 05:05 PM2024-05-08T17:05:56+5:302024-05-08T17:06:48+5:30

कोणाचा आशीर्वाद : ग्रामीण भागात फोफावला अवैध धंदा

Sale of fake flavored tobacco is in lakhs in Armori | बनावट सुगंधी तंबाखू विक्रीतून आरमोरीत लाखोंची उलाढाल

Sale of fake flavored tobacco is in lakhs in Armori

लोकमत न्यूज नेटवर्क 
आरमोरी :
तालुक्यात बनावट सुगंधित तंबाखूचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावत चालला आहे. यातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आरमोरी व तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षांपासून बनावट सुगंधित तंबाखू विक्रीचा अवैध व्यवसाय राजरोस सुरू असल्याचे चित्र आहे. मात्र, या व्यवसायाचा खतपाणी मिळत असल्याने ठोक व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले असून, या धंद्यातून काही माफियांनी मोठी माया जमविल्याचे सांगितले जाते. शासनाने प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, गुटखा विक्रीवर बंदी करणारा कठोर कायदा केला असला तरी त्याची अंमलबजावणी येथे तरी होत नाही, असे दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा व्यवसाय खुलेआम सुरू असल्याने व्यावसायिक हे मालामाल झाले आहे.


असे चालते नेटवर्क

• वैरागड, ठाणेगाव, आरमोरी, पिसेवडधा ही व्यावसायिकांची प्रमुख केंद्र आहेत. तसेच देसाईगंज येथील ठोक व्यावसायिक यांच्याकडून आरमोरी येथील किराणा दुकानदार यांना बनावट सुगंधित तंबाखूचा पुरवठा केला जात आहे. या भागातील ठोक व्यावसायिकांचे नेटवर्क तालुक्यासह जिल्ह्यांतील इतर भागात पोहोचले आहेत.
• लहान किराणा दुकानदारांना सदर माल पुरवठा केला जातो व किराणा दुकानदाराकडून पानटपरीवाल्यांना पुरवठा केला जात आहे.


पाळेमुळे खोलवर

• तालुक्यात बनावट सुगंधित तंबाखू तयार करून त्याची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत.
• साधा तंबाखू नागपूर व नजीकच्या छत्तीसगड राज्यातून आणून त्यावर केमिकलद्वारे प्रक्रिया करून व मशीनद्वारे पॅकिंग करून बनावट सुगंधित तंबाखू तयार केली जाते. 
• तयार केलेला लाखों रुपयांची बनावट तंबाखू शहरात व तालुक्यातील ग्रामीण भागात दररोज वाहनाद्वारे पोहोच केली जात आहे.


गुन्हे शाखेची कारवाई, स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष कसे?

• दिवसांपूर्वी गडचिरोली येथील गुन्हे शाखेच्या चार पोलिसांनी ठाणेगाव टी पॉइंटवर पाळत ठेवून अवैधपणे वाहतूक करीत असलेला १८ लाखांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त केली होती.
•याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेतले होते. गुन्हे शाखा कारवाई करते, मग स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.


प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कायद्यानुसार निश्चितच कारवाई केली जाईल. यामध्ये कुणाचीही गय जाणार नाही.
- विनोद रहांगडाले, पोलिस निरीक्षक, आरमोरी

 

Web Title: Sale of fake flavored tobacco is in lakhs in Armori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.