Maharashtra Election 2019 ; आरमोरीत शिवसेनेचे अस्तित्व पणाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 06:00 AM2019-10-06T06:00:00+5:302019-10-06T06:00:21+5:30
हक्काचा मतदार संघ गमवल्याचे शल्य येथील निष्ठावंत शिवसैनिक व कार्यकर्त्यांना बोचत आहे. जिल्ह्यातील तीन मतदार संघापैकी आरमोरी हा एकमेव मतदार संघ सेनेच्या वाट्याला होता. पेशाने प्राथमिक शिक्षक असलेले त्यावेळचे नाट्य कलावंत हरिराम वरखडे यांना शिवसेनेने विधानसभेचे तिकीट दिले. त्यांच्या रूपाने शिवसेनेने हे क्षेत्र प्रथमच काबीज केल्यानंतर सतत १५ वर्ष सेनेने हा मतदार संघ आपल्या ताब्यात ठेवला.
महेंद्र रामटेके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून काही वर्षांपूर्वी ओळख असलेल्या आरमोरी विधानसभा क्षेत्रात सन १९९० पासून ते सन २००४ पर्यंत तब्बल तीन टर्म शिवसेनेने आरमोरी विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधीत्व केले. सेना-भाजप युतीच्या समझोत्यात हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला आला होता. या क्षेत्रात काँग्रेस विरूद्ध सेना अशीच लढत राहायची. मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजप-सेनेत दुरावा निर्माण झाला आणि युती तुटली. त्यामुळे सेनेला आपला पारंपरिक मतदार संघ गमवावा लागला. यावेळी निवडणूकपूर्व झालेल्या युतीतही भाजपने हा मतदार संघ शिवसेनेकडून हिसकावल्याने आता या मतदार संघात शिवसेनेचे अस्तित्वच पणाला लागले आहे.
हक्काचा मतदार संघ गमवल्याचे शल्य येथील निष्ठावंत शिवसैनिक व कार्यकर्त्यांना बोचत आहे. जिल्ह्यातील तीन मतदार संघापैकी आरमोरी हा एकमेव मतदार संघ सेनेच्या वाट्याला होता. पेशाने प्राथमिक शिक्षक असलेले त्यावेळचे नाट्य कलावंत हरिराम वरखडे यांना शिवसेनेने विधानसभेचे तिकीट दिले. त्यांच्या रूपाने शिवसेनेने हे क्षेत्र प्रथमच काबीज केल्यानंतर सतत १५ वर्ष सेनेने हा मतदार संघ आपल्या ताब्यात ठेवला. १९९५ च्या निवडणुकीत सेनेने डॉ.रामकृष्ण मडावी यांना तिकीट दिली. ते सुद्धा दोन वेळा निवडून आले. त्यावेळी आरमोरी मतदार संघ हा पूर्णत: शिवसेनामय झाला होता. प्रत्येक गावात शिवसेनेनेचा गट व जनाधार होताच, मात्र २००४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या या गडाला खिंडार पडले आणि काँग्रेसचे आनंदराव गेडाम निवडून आले. त्यांनी सुद्धा दोन वेळा या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व केले. २००४ पासून शिवसेनेला या क्षेत्रात ओहोटी लागायला सुरूवात झाली. तरी सुद्धा २०१४ पर्यंत या मतदार संघात काँग्रेस विरूद्ध शिवसेना अशीच लढत होत होती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप व सेनेत दुरावा निर्माण झाला. युती तुटली व स्वतंत्रपणे निवडणूक लढण्यात आली. या संधीचा फायदा घेत भाजपने कृष्णा गजबे यांच्या रूपाने भाजपचा झेंडा या मतदार संघावर रोवला. आता पुन्हा हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला केव्हा येणार आणि केव्हा या मतदार संघात पक्षाला सुगीचे दिवस येणार, अशी प्रतीक्षा काही निष्ठावंत कार्यकर्त्यांना लागली आहे.
बंडखोरीमुळे सेनेला अधोगती
काँग्रेस विरूद्ध सेना अशी लढत होत असलेल्या आरमोरी विधानसभा मतदार संघाला २००९ च्या निवडणुकीने कलाटणी दिली. त्यावेळी शिवसेनेने माजी आ.डॉ.रामकृष्ण मडावी व त्यावेळी या क्षेत्राचे तिकीट मिळविण्यासाठी ईच्छुक असलेले सुरेंद्रसिंह चंदेल या दोघांनाही वगळून श्रावण रंधये यांना तिकीट दिली. त्यामुळे २००९ च्या निवडणुकीत सेनेत बंडखोरी होऊन चंदेल व डॉ.मडावी यांनी निवडणूक लढविली. त्यावेळी काँग्रेसचे आनंदराव गेडाम व चंदेल या दोघांमध्ये लढत झाली. या लढतीत काँग्रेसने दुसऱ्यांदा हा मतदार संघ ताब्यात घेतला. त्यावेळी शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली नसती तर चित्र वेगळे राहिले असते. भाजपच्या कब्जामुळे या मतदार संघातील सेनेचे अस्तित्वच पणाला लागले आहे. शिवसेनेची संघटन बांधणीही आता पूर्वीसारखी राहिली नसल्यामुळे कार्यकर्ते विखुरले गेले आहेत.