जीएनएम अभ्यासक्रम बंद करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 12:25 AM2019-05-03T00:25:31+5:302019-05-03T00:26:22+5:30
जीएनएम अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील विद्यार्थिंनींना नोकरीची संधी उपलब्ध होते. तसेच ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयांमध्ये सेवा देण्यास नर्सेस उपलब्ध होतात. त्यामुळे जीएनएमचा अभ्यासक्रम बंद करू नये, .......
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जीएनएम अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील विद्यार्थिंनींना नोकरीची संधी उपलब्ध होते. तसेच ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयांमध्ये सेवा देण्यास नर्सेस उपलब्ध होतात. त्यामुळे जीएनएमचा अभ्यासक्रम बंद करू नये, अशी मागणी चातगाव येथील डॉ.साळवे नर्सिंग कॉलेजचे अध्यक्ष डॉ.प्रमोद साळवे यांनी इंडियन नर्सिंग कॉन्सीलचे सदस्य खासदार डॉ.विकास महात्मे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जीएनएम हा अभ्यासक्रम बंद करून त्याचे रूपांतर बीएससी नर्सिंगमध्ये केले जाणार आहे. हा उद्देश चांगला आहे. मात्र वस्तूस्थितीला धरून नाही. कारण प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, जिल्हा सामान्य रूग्णालय व इतर खासगी रूग्णालयांमध्ये ९५ टक्के नर्सेस जीएनएम अभ्यासक्रम केलेल्या आढळतात. गोरगरीब पाकलाच्या मुली जीएनएम करून नोकरी प्राप्त करतात. जीएनएमला सहज अॅडमिशन मिळते. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा असल्याने दुर्गम भागातील मुलींना अभ्यासाची अडचण जात नाही. मात्र बीएससी नर्सिंग अभ्यासक्रम फक्त इंग्रजी माध्यमामध्ये राहतो. ग्रामीण भागातील मुली या अभ्यासक्रमाला शिकणार नाही. जीएनएमला कोणत्याही शाखेची विद्यार्थिनी प्रवेश घेऊ शकते. त्यामुळे हा अभ्यासक्रम बंद करू नये, अशी मागणी डॉ.प्रमोद साळवे यांनी निवेदनातून केली आहे. यावेळी डॉ.अमित रामणे हजर होते.