२५ हजार आजी-आजोबा साक्षरतेच्या परीक्षेत उत्तीर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 04:41 PM2024-05-07T16:41:41+5:302024-05-07T16:42:44+5:30

Gadchiroli : शिक्षण विभागामार्फत साक्षरतेचे प्रमाणपत्र देऊन केला जाणार गौरव

25 thousand grandparents passed the literacy test | २५ हजार आजी-आजोबा साक्षरतेच्या परीक्षेत उत्तीर्ण

25 thousand grandparents passed the literacy test

लोकमत न्यूज नेटवर्क 
गडचिरोली :
नवभारत साक्षता अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील ३३ हजार ७८७ निरक्षरांनी परीक्षा दिली होती. त्यात बहुतांश वयस्क नागरिकांचा समावेश होता. त्यातील २४ हजार ६४४ जण परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. 

शिक्षण विभाग (योजना) अंतर्गत त्यांना लवकरच साक्षर झाल्याचे प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे. निरक्षरता हा व्यक्तीच्या विकासातील सर्वांत मोठा अडथळा आहे. अशा व्यक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रत्येक व्यक्ती जास्त शिकला नसला तरी किमान त्याला अक्षर ओळख असावी, यासाठी केंद्र शासनामार्फत प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणजे केंद्र शासनाने नवभारत साक्षर अभियान सुरू केले आहे. याअंतर्गत सर्वप्रथम निरक्षर नागरिकांचा जिल्हा परिषद शिक्षकांमार्फत शोध घेण्यात आला. जिल्ह्यात ६१ हजार ९२८ नागरिक निरक्षर आढळून आले. गावातील काही व्यक्ती स्वयंसेवक म्हणून काम करीत या निरक्षर नागरिकांना शिकवले. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात परीक्षा घेण्यात आली. ३३ हजार ७८७ नागरिकांनी परीक्षा दिली. त्यापैकी २४ हजार ६४४ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर ९ हजार १४३ परीक्षार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यांची सप्टेंबर महिन्यात पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा देणाऱ्या काही नागरिकांनी तर वयाची ७५ वर्षे पार केले होते.

९ हजार १४३ जणांना सुधारणेची गरज
परीक्षा दिलेल्यांपैकी ९ हजार १४३ जणांनी आवश्यक तेवढे गुण मिळवू शकले नाही. त्यांना 'सुधारणेची गरज असा शेरा देण्यात आला आहे. त्यांना शिकवण्याचे काम अजूनही सुरूच आहे. त्यांची सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेतली जाणार आहे. यावेळेस उत्तीर्ण झाल्यास त्यांना साक्षरतेचे प्रमाणपत्र देऊन गौरवले जाईल.

शिकण्याला वयाचे बंधन नसतेच
व्यक्ती लहान असल्यापासून तर मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत काही तरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करीत असते. त्यासाठी केवळ संधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. हीच बाब नवसाक्षरतेची परीक्षा देणाऱ्यांबाबत घडला आहे. हाताला लकवा मारला असतानाही त्यांनी बाराखडी शिकली. एवढेच नाही, तर परीक्षा उत्तीर्ण केली. म्हणजेच शिकण्याला वयाचे बंधन नाही हे सिद्ध करून दाखवले आहे.


जे नागरिक उत्तीर्ण झाले त्यांना शासनाच्या आदेशानुसार साक्षरतेचे प्रमाणपत्र देऊन गौरवले जाईल. जे नागरिकांना सुधारणेची गरज
आहे, असा शेरा दिला आहे. त्यांची सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेतली जाईल. सर्वेक्षणात निरक्षर आढळलेल्यांपेकी ज्यांनी परीक्षा दिली नाही त्यांना पुन्हा शिकवून त्यांना परीक्षा देण्यास प्रोत्साहित केले जाईल.
- वैभव बारेकर, शिक्षणाधिकारी (योजना)
 

Web Title: 25 thousand grandparents passed the literacy test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.