टॅक्स भरा; नाहीतर तुमचा मोबाइल होईल बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2024 07:37 AM2024-05-13T07:37:40+5:302024-05-13T07:38:40+5:30

बरेच जण तर नाइलाज म्हणून किंवा टॅक्स चुकवता येत नाही, म्हणूनच भरतात हीदेखील वस्तुस्थिती आहे.

pay taxes otherwise your mobile will be off | टॅक्स भरा; नाहीतर तुमचा मोबाइल होईल बंद!

टॅक्स भरा; नाहीतर तुमचा मोबाइल होईल बंद!

आपल्याकडे जी काही संपत्ती किंवा जी काही मिळकत आहे, जे उत्पन्न आपण कमावतो, त्यावर केवळ आपला आणि आपलाच अंतिम अधिकार असावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यामुळेच ज्यावेळी आयकर किंवा इन्कम टॅक्स भरायची वेळ येते, तेव्हा जवळपास सगळेच जण नाक मुरडतात किंवा टॅक्स चुकवायचा त्यांचा प्रयत्न असतो. जगभरात कोणीही त्याला अपवाद नाही. मात्र, ज्याचं जेवढं जास्त उत्पन्न, तेवढा जास्त कर त्यानं भरावा, हे तत्त्व जवळपास जगातल्या सर्वच देशांनी मान्य केलं आहे. 

कारण याच पैशाचा उपयोग लोककल्याणकारी कामं करण्यासाठी, विकासासाठी केला जातो. गरीब किंवा ज्यांचं उत्पन्न कमी आहे, त्यांना जगण्याच्या मूलभूत हक्कासाठीच आपल्या कमाईतला मोठा हिस्सा वापरावा लागतो. त्यामुळे अत्यल्प उत्पन्न असणाऱ्यांना आयकरातून सूट किंवा जसं त्यांचं उत्पन्न वाढत जाईल त्याप्रमाणे त्यांच्यावर टॅक्स लावला जातो. पण, श्रीमंतांपासून ते मध्यमवर्गीयांपर्यंत फार थोडे लोक प्रामाणिकपणे टॅक्स भरतात, असं सगळीकडेच आढळून येतं. बरेच जण तर नाइलाज म्हणून किंवा टॅक्स चुकवता येत नाही, म्हणूनच भरतात हीदेखील वस्तुस्थिती आहे. 

आता पाकिस्तानचंच बघा ना.. आर्थिक डबघाईनं हा देश रसातळाला चालला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कर्जाचा डोंगर रोजच्या रोज वाढतोच आहे. महागाई आकाशाला भिडते आहे. त्याचवेळी देशातील लोकही आयकराची चोरी करताहेत किंवा आयकर भरण्यास टाळाटाळ करताहेत. पाकिस्तान सरकारनंच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२२मध्ये आयकर भरणाऱ्यांची संख्या सुमारे साठ लाख होती, ती या वर्षी थेट चाळीस लाखांवर आली आहे. गेल्या वर्षी टॅक्स भरणाऱ्या लोकांची संख्या पाकिस्तानात साधारण ३१ लाख होती. सरकारनं दट्ट्या दिल्यानंतर टॅक्स भरणाऱ्यांची संख्या थोडी वाढली; पण, तरीही ती ४० लाखांच्या पुढे गेली नाही. इन्कम कुठूनच नाही, खर्चही वाढतोय, इतर देशांकडून मदत मिळण्याचीही मारामार, अगदी त्यांच्याकडे पदर पसरण्याची आणि रडण्याची वेळ आली असताना, लोकही टॅक्स भरत नाहीत म्हटल्यावर पाकिस्तान सरकारचंही धाबं दणाणलं आहे. 

लोकांनी टॅक्स भरावा यासाठी पाकिस्तानच्या ‘फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू’नं (एफबीआर- त्यांच्याकडचा आयकर विभाग) एक नवीनच क्लृप्ती शोधून काढली आहे. एफबीआरनं त्यासाठी लोकांना धमकीच दिली आहे. १५ मेपर्यंत जे लोक आयकर भरणार नाहीत, त्यांचं सीम कार्डच तात्पुरतं ब्लॉक करण्यात येणार आहे. जे लोक आयकर भरतील, त्यानंतरच त्यांचं सीम कार्ड सुरू करण्यात येईल आणि त्यांचा मोबाइल सुरू होईल! आपला मोबाइल बंद झाला तर काय, या धास्तीनं अनेक लोकांचा जीव आताच खाली-वर होतो आहे. तरीही काहींनी मात्र बघू पुढचं पुढे असंच धोरण स्वीकारलं आहे. 

आजही अनेकांसाठी आपला मोबाइल म्हणजे त्यांच्या जगण्या-मरण्याचा भाग झालेला आहे. मोबाइल अगदी काही दिवसांसाठीही बंद होणं किंवा डिॲक्टिव्हेट होणं त्यांना परवडण्यासारखं नाही. त्यामुळे बहुतांश टॅक्सबुडवे टॅक्स भरतील, असा जाणकारांचा होरा आहे.  येत्या काही दिवसांत पाच लाख लोकांनी तरी टॅक्स भरावा आणि ते भरतील, अशी पाकिस्तानी आयकर विभागाची अपेक्षा आहे. पाकिस्तानात सध्या दोन कोटी लोकांकडे मोबाइल आहेत. त्यातील किमान पाच लाख लोकांनी इन्कम टॅक्स भरलेला नाही. ‘नाक दाबलं की तोंड उघडतं’ या न्यायानुसार लोकांचा मोबाइल बंद झाल्यावर ते आपोआप टॅक्स भरतील, असा दावाही एका वरिष्ठ आयकर अधिकाऱ्यानं केला आहे. दुसरीकडे सरकारच्या या कृतीवर अनेक करदाते मात्र नाराज आहेत. सरकार सुविधा तर काहीच देत नाही; पण, जिवाचा आटापिटा करून आम्ही थोडीफार कमाई करतो, तर तेही सरकार हिसकावून घेते, असं अनेक करदात्यांचं म्हणणं आहे. एका अधिकाऱ्यानं सांगितलं, करबुडव्यांचा मोबाइल बंद करणं हा एकदम जालीम उपाय आहे. करबुडव्यांची यादी आमच्याकडे तयार आहे. १५ मेनंतर त्यांचे मोबाइल बंद होतील.

दर मंगळवारी यादी प्रसिद्ध होणार! 

आयकर अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कोण टॅक्स भरतंय आणि कोण भरत नाही, याकडे आमचं बारकाईनं लक्ष असेल. दर मंगळवारी एक नवीन यादी सर्व्हिस प्रोव्हायडर्सना दिली जाईल. या यादीत त्या करदात्यांचे नंबर असतील, ज्यांनी इन्कम टॅक्स भरलेला आहे. या यादीनुसार मग त्या करदात्यांचे मोबाइल सुरू होतील. याउपरही जे करदाते टॅक्स भरणार नाहीत, त्यांच्याविरुद्ध आणखी कडक कारवाई केली जाईल. मोबाइल आणखी जास्त काळ किंवा कायमचा बंद करण्याची तरतूददेखील त्यात आहे.
 

Web Title: pay taxes otherwise your mobile will be off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.