धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 03:54 PM2024-05-07T15:54:26+5:302024-05-07T16:06:53+5:30

पोलिसांनी मात्र हा प्रकार निवडणूक किंवा मतदानावरुन झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

Shocking! Youth killed outside polling station in Dharashiv district | धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

भूम (जि.धाराशिव) : भूम तालुक्यातील पाटसांगवी गावात मंगळवारी दुपारी मतदान केंद्राच्या बाहेरच तीन तरुणांमध्ये वाद झाला होता. यातून धारधार शस्त्राने भोसकून एका तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे. मयत तरुण हा ठाकरे गटाचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात असून, पोलिसांनी मात्र हा प्रकार निवडणूक किंवा मतदानावरुन झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

पाटसांगवी गावातील गौरव उर्फ लाल्या अप्पा नाईकनवरे (२३) याचा गावातीलच समाधान नानासाहेब पाटील व अन्य तरुणासोबत सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास वैयक्तिक कारणावरुन वाद झाला होता. यावेळी आरोपी लाल्या याने त्याच्याकडील धारधार शस्त्र काढून समाधानवर व सोबतच्या मित्रावर हल्ला केला. या घटनेत हे दोघेही गंभीर जखमी झाले. ही घटना लक्षात येताच मतदान केंद्रावरील पोलिस व गावातील नागरिक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने जखमींना बार्शी येथे उपचारासाठी रवाना केले. दरम्यान, वाटेतच समाधान पाटील याचा मृत्यू झाला आहे. मयत समाधान पाटील हा ठाकरे गटाचा कार्यकर्ता असल्याचे चर्चिले जात आहे. घटनेनंतर गावात पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला आहे. निर्भय वातावरणात मतदान करता यावे याकरिता पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आले. यानंतर गावातील दोन्ही मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरुळीत सुरु झाली.

दरम्यान, यासंदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी गौरीशंकर हिरेमठ यांनी या प्रकरणात कायदेशीर कार्यवाही सुरु असल्याचे सांगितले. तसेच या घटनेचा मतदान अथवा निवडणुकीशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Shocking! Youth killed outside polling station in Dharashiv district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.