खोट्या सर्वेक्षणातून सर्वच 'मराठा' गरीब दाखविण्याचा खटाटोप, प्रकाश शेंडगेंनी घेतला आक्षेप
By बाबुराव चव्हाण | Published: January 24, 2024 06:32 PM2024-01-24T18:32:12+5:302024-01-24T18:34:06+5:30
मागासवर्ग आयोग हा मराठा आयोग झाला आहे.
धाराशिव : कुणबी दाखल्यांच्या आधारे मराठा समाज जर ओबीसींचे आरक्षण घेणार असेल तर ते त्यांचेच नुकसान ठरणार आहे. हे आरक्षण घेतल्यास ईडब्ल्यूएसचा लाभ त्यांना घेता येणार नाही. तसेच केंद्र सरकारने रोहिणी आयोग आणला आहे. त्यांच्या अहवालाआधारे ओबीसीतही ९-९ टक्क्यांचे वर्गीकरण होणार आहे. यामुळे मराठा समाजाला या नऊ टक्क्यांतूनच जवळपास दोन टक्के आरक्षण मिळेल, याचा विचार समाजाने केला पाहिजे, असे मत माजी आ. प्रकाश शेंडगे यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.
धाराशिव येथे माध्यमांशी संवाद साधताना शेंडगे म्हणाले, सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, दुसरीकडे ५४ लाख कुणबी दाखले सापडल्याचे जाहीर केले. सगेसोयऱ्यांचा ड्राफ्ट तयार केला आहे. त्याआधारे किमान एका दाखल्यावर पाच जणांना तरी कुणबी दाखले मिळतील. अडीच कोटींवर समाजाला दाखले मिळाल्यास मग शिल्लक राहते कोण? हे सगळे सरकारचे ओबीसी समाजाविरुद्ध षडयंत्र आहे. ते आम्ही उलथवून लावू. २६ जानेवारीला सकल ओबीसी समाज मुंबईच्या आझाद मैदानावर आरक्षण बचावासाठी आंदोलन करणार आहोत. संपूर्ण ओबीसी समाजाने यासाठी मुंबईत यावे. अन्यथा पुढच्या पिढीचे मोठे नुकसान होईल, असे मतही शेंडगे यांनी मांडले.
खोटे सर्वेक्षण सुरू, कोर्टात जाऊ...
मागासवर्ग आयोग हा मराठा आयोग झाला आहे. प्रगणक जवळपास सर्वांनाच गरीब दाखवण्याचा खटाटोप करीत आहेत. आयोगाचा अहवाल आल्यानंतर आम्ही त्यास कोर्टात आव्हान देणारच आहोत. सोबतच जे प्रगणक खोटे सर्वेक्षण भरतील त्यांच्यावरही खटले दाखल करू, असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला.