शिरसगावात दोन घरफोड्या, पाच लाखांचा ऐवज चोरीस; देवाच्या चांदीच्या मूर्तीही लांबवल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 04:26 PM2022-12-25T16:26:57+5:302022-12-25T16:30:35+5:30
मेहुणबारे पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव - तालुक्यातील शिरसगाव येथे दोन बंद घरे फोडून चोरट्यांनी पाच लाखांच्या रोकडसह सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. ही घटना २२ ते २४ डिसेंबर दरम्यान घडली. मेहुणबारे पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव येथील विजय केशवराव चव्हाण आणि नंदलाल नामदेव शेवाळे या दोघांच्या बंद घरातून ही चोरी झाली. चव्हाण यांच्या घरातून २० हजार रुपये किंमतीच्या प्रत्येकी अर्धा ग्रॅम वजनाच्या एकूण दहा अंगठ्या, ९ हजार रुपये किंमतीचा दोन ग्रॅम वजनाचा सोन्याचा शिक्का, एक हजार रुपये किंमतीचे दोन चांदीचे देव, १० हजार रुपये किंमतीच्या २५ साड्या आणि नंदलाल शेवाळे यांच्या घरातून पाच लाखांची रोकड लांबवण्यात आली.
याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध मेहूणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड करीत आहेत.