'त्यानं' शरीरात लपवले होते १५ कोटींचे कोकेन, मुंबई विमानतळावर अटक
By मनोज गडनीस | Published: May 9, 2024 08:44 PM2024-05-09T20:44:40+5:302024-05-09T20:45:38+5:30
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयव्हरी कोस्ट येथून मुंबईत कोकेनचा साठा येत असल्याची विशिष्ट माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.
मुंबई - कोकेन या अंमली पदार्थाच्या तब्बल ७७ गोळ्या शरीरात लपवत त्यांची मुंबईत तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका परदेशी नागरिकाला केंद्रीय महसूल गुप्तचर विभागाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १५ कोटी रुपये इतकी आहे. ६ एप्रिल रोजी त्याला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याच्या शरीरातून कोकेनच्या या ७७ गोळ्या काढण्यात आल्या.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयव्हरी कोस्ट येथून मुंबईत कोकेनचा साठा येत असल्याची विशिष्ट माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी विमातळावर सापळा रचला होता. संबंधित विमानाने आलेल्या एका प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने शरीरात कॅप्सूलमध्ये अंमली पदार्थ लपविल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाच्या निर्देशानुसार त्याच्यावर रुग्णालयात उपचार करून त्याच्या शरीरातून हे कोकेन बाहेर काढण्यात आले. या कोकेनचे वजन १ किलो ४६८ ग्रॅम इतके आहे. ६ एप्रिल ते ८ एप्रिल असे दोन दिवस त्याच्या शरीरातून या कोकेनच्या कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या.