गांजा तस्करास तीन वर्षे कारावासाची शिक्षा, ठाणे न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
By जितेंद्र कालेकर | Published: May 10, 2024 10:54 PM2024-05-10T22:54:17+5:302024-05-10T22:55:15+5:30
मीरा रोड येथील तीन वर्षांपूर्वीची घटना
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: तब्बल चार किलो ९५० ग्रॅम वजनाचा २९ हजार ७०० रुपयांच्या गांजाची तस्करी करणाऱ्या कीर्ती सचदे (२६, रा. मीरा रोड पूर्व, ठाणे) याला तीन वर्षे नऊ दिवसांच्या साध्या कारावासाची, तसेच दहा हजारांच्या दंडाची शिक्षा ठाणे विशेष न्यायालयाने सुनावली. दंड न भरल्यास ३० दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षाही आरोपीला भोगावी लागणार आहे.
मीरा रोड भागात १ मे २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास तिवारी कॉलेजच्या मागील भागातील रोडवर किर्ती (२६, रामेश्ववर पार्क, मीरारोड पूर्व) हा गांजा तस्करीसाठी येणार असल्याची माहिती मीरा रोड पोलिसांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे कीर्ती याला मीरा रोड पोलिसांनी पकडले. त्याच्या ताब्यातून चार किलो ९५० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली. याच खटल्याची सुनावणी विशेष एनडीपीएस कायद्याचे न्यायाधीश डी. आर. देशपांडे यांच्या न्यायालयात ९ मे २०२४ रोजी झाली. तेव्हा एका साक्षीदाराच्या सुनावणीनंतर आरोपीने या गुन्ह्याची कबुली दिली. ॲड. रेखा हिवराळे यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले.