नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!

By योगेश पांडे | Published: May 8, 2024 11:47 PM2024-05-08T23:47:45+5:302024-05-08T23:48:53+5:30

२०१९ साली घडलेले महिला मृत्यूप्रकरण चर्चेत; न्यायालयाच्या निर्देशांनंतर गुन्हा दाखल

Case registered against 11 doctors along with the Dean of Nagpur Medical as accused of negligence! | नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!

नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: मेडिकलचे अधिष्ठाता डॉ.राज गजभिये यांच्यासह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१९ साली मेडिकलमध्ये शस्त्रक्रियेसाठी आलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात तिच्या कुटुंबियांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या निर्देशांनंतर अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

डॉ.राज गजभिये यांच्यासह डॉ.भुपेश तिरपुडे, डॉ.हेमंत भनारकर, डॉ.वासुदेव बारसागडे, डॉ.अपुर्वा आनंद, डॉ.सुश्मिता सुमेर, डॉ.विक्रांत अकुलवार, डॉ.गायत्री देशपांडे, डॉ.गिरीश कोडापे, डॉ.विधेय तिरपुडे व डॉ.गणेश खरकाटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा न्यायालयाचे सेवानिवृत्त अधीक्षक केवलराम पांडुरंग पटोले (६५) हे तक्रारदार आहेत. त्यांची पत्नी पुष्पा यांच्या मानेवरील गाठीसंदर्भात डॉ.गजभिये यांना दाखविले होते व ५ जुलै २०१९ रोजी त्यांना शस्त्रक्रियेसाठी बोलविण्यात आले होते. त्यांना त्या दिवशी दाखल करण्यात आले. ६ जुलै रोजी पुष्पा यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. मात्र अचानक पत्नीची प्रकृती गंभीर झाल्याचे दोन डॉक्टरांनी सांगितले. दुपारी त्यांच्या पत्नीला बाहेर आणण्यात आले. त्यांच्या डोळ्यावर कापूस ठेवला होता व नाकाला रबरी नळी जोडली होती. त्यांना आयसीयूमध्ये नेण्यात आले व नातेवाईकांना भेटूदेखील दिले नाही.

डॉ.गजभिये यांनी दुसऱ्या दवाखान्यात नेऊ देण्यासदेखील नकार दिला. ८ जुलै रोजी पटोले यांनी ओळखीच्या डॉक्टरांच्या माध्यमातून डिस्चार्जसाठी संपर्क साधला असता रात्री त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. पत्नीचे शवविच्छेदनदेखील झाले नाही. शस्त्रक्रियेदरम्यानच पत्नीचा मृत्यू झाला होता, मात्र निष्काळजीपणा लपविण्यासाठी गजभिये व इतर डॉक्टरांनी पुष्पा यांना कार्डिॲक अरेस्ट आल्याचे नाटक केल्याचा आरोप पटोले यांनी केला.

३० जून २०२० रोजी त्यांनी अजनी पोलीस ठाण्यात डॉ.गजभिये व इतर डॉक्टरांविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीवर चौकशी समिती नेमली असता पाच डॉक्टरांच्या समितीने पुष्पा यांचा मृत्यू कार्डिॲक अरेस्टने झाल्याचे अहवालात नमूद केले. पटोले यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना अहवालाचे पुनरावलोकन करण्याबाबत अर्ज केला होता. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांनी पाच डॉक्टरांची समिती नेमली व सगळ्या कागदपत्रांची तपासणी केली. शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाची काळजी घेण्यात निष्काळजीपणा झाला होता असे समितीने अहवालात नमूद केले.

१५ एप्रिल २०२२ रोजी पटोले यांनी नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार केली. तसेच न्यायालयातदेखील धाव घेतली. २ मे रोजी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी संबंधित डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार अजनी पोलीस ठाण्यात या ११ डॉक्टरांविरोधात कलम २०१, २०२, ३०४-अ व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुठलीही हलगर्जी नाही : गजभिये

यासंदर्भात डॉ.राज गजभिये यांच्याशी संपर्क करण्यात आला असता या प्रकरणात कुठलीही हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा झालेला नाही, असा दावा त्यांनी केला.

Web Title: Case registered against 11 doctors along with the Dean of Nagpur Medical as accused of negligence!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.