IND vs SA, 2nd ODI Live Updates : कसोटीपाठोपाठ वन डे मालिकाही गमावली; टीम इंडियाची यजमान दक्षिण आफ्रिकेनं वाईट अवस्था केली

India vs South Africa, 2nd ODI Live Updates : कसोटी मालिकेपाठोपाठ भारताला वन डे मालिकेतही यजमान दक्षिण आफ्रिकेनं पराभवाची चव चाखवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 10:04 PM2022-01-21T22:04:56+5:302022-01-21T22:05:40+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA, 2nd ODI Live Updates : South Africa win the 2nd ODI by 7 wickets and seal the series by 2-0 | IND vs SA, 2nd ODI Live Updates : कसोटीपाठोपाठ वन डे मालिकाही गमावली; टीम इंडियाची यजमान दक्षिण आफ्रिकेनं वाईट अवस्था केली

IND vs SA, 2nd ODI Live Updates : कसोटीपाठोपाठ वन डे मालिकाही गमावली; टीम इंडियाची यजमान दक्षिण आफ्रिकेनं वाईट अवस्था केली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa, 2nd ODI Live Updates : कसोटी मालिकेपाठोपाठ भारताला वन डे मालिकेतही यजमान दक्षिण आफ्रिकेनं पराभवाची चव चाखवली. आज पुन्हा एकदा फलंदाजांनी पाट्या टाकल्या. रिषभ पंत, लोकेश राहुल आणि शार्दूल ठाकूर वगळता इतरांची कामगिरी समाधानकारक झाली नाही. विराट कोहली भोपळाही फोडू शकला नाही. गोलंदाजीत टीम इंडिया सपशेल अपयशी ठरली. भुवनेश्वर कुमारची लय पूर्णपणे बिघडलेली जाणवली. दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज सहज धावा करताना दिसले. क्विंटन डी कॉक व येनमन मलान यांनी रचलेल्या भक्कम पायावर कर्णधार टेम्बा बवुमा,एडन मार्कराम व रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन यांनी विजयी कळस चढवला. मलान व बवुमा पाठोपाठ बाद झाल्यानं भारतीयांच्या आशा उंचावल्या होत्या, परंतु गोलंदाजांना पुनरागमन करता आले नाही. आफ्रिकेनं हा सामना सहज जिंकून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.

नाणेफेकीचा कौल बाजूनं लागल्यानंतर लोकेश राहुलनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन २९ धावांवर बाद झाला. रिषभ पंत व लोकेश यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी केली. ३२व्या षटकात ही भागीदारी संपुष्टात आली. सिसांडा मगालाच्या गोलंदाजीवर लोकेश ५५ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर पुढच्याच षटकात तब्रेझ शम्सीच्या गोलंदाजीवर रिषभ झेलबाद झाला.रिषभनं ७१ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांच्या मदतीनं ८५ धावा केल्या.  श्रेयस अय्यर व वेंकटेश अय्यर यांच्यावर पुढील १७ षटकं खेळून काढून स्वतःला सिद्ध करण्याची संधी होती. पण, श्रेयस ११ धावांवर तर वेंकटेश २२ धावांवर बाद झाला. क्विंटन डी कॉकनं पुन्हा एकदा अप्रतिम स्टम्पिंग करून वेंकटेशला माघारी पाठवले. शार्दूलची फटकेबाजी सुरू राहिली. आर अश्विननेही जरा हात मोकळे केले. भारतानं ६ बाद २८७ धावांचा डोंगर उभा केला. शार्दूल ४०, तर अश्विन २५ धावांवर नाबाद राहिले. 


क्विंटन डी कॉक आणि येनमन मलान यांनी आफ्रिकेला अपेक्षित सुरुवात करून दिली. क्विंटननं पहिल्या दोन षटकांत २३ धावा चोपल्यानंतर कर्णधार लोकेशनं तिसऱ्या षटकात आर अश्विनला पाचारण केले. ८व्या षटकात अश्विननं आफ्रिकेला पहिला दणका दिलाच होता. क्विंटन डी कॉकचा पुढे येऊन फटका मारण्याचा प्रयत्न फसला अन् चेंडू रिषभ पंतकडे गेला. पण, यष्टिंमागून बडबड करणाऱ्या रिषभनं स्टम्पिंगची सोपी संधी गमावली. क्विंटन तेव्हा ३१ धावांवर खेळत होता. त्यात १०व्या षटकात भारतानं एक DRS गमावला. शार्दूल ठाकूरनं भारताला पहिलं यश मिळवून देताना क्विंटनला बाद केले. क्विंटननं ७ चौकार व ३ षटकारांच्या मदतीनं ७८ धावा केल्या. क्विंटन व मलान यांनी पहिल्या विकेटसाठी १३२ धावा जोडल्या. 

मलान व कर्णधार टेम्बा बवुमा यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना आफ्रिकेला विजयाच्या उंबरठ्यावर आणून बसवले. मलाननं अर्धशतकी खेळी करून तीन आकडी धावांच्या दिशेनं कूच केली. पण, जसप्रीत बुमराहनं आफ्रिकेला दुसरा धक्का देताना मलानला नर्व्हस ९०s मध्ये बाद केले. मलान १०८ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारांसह ९१ धावांवर त्रिफळाचीत झाला. मात्र, त्यानं वन डे क्रिकेटमध्ये सर्वात कमी १२ डावांमध्ये ७०० धावा करण्याचा विक्रम नावावर केला. मलान व बवुमा यांनी  ७६ चेंडूंत ८० धावांची भागीदारी केली. पुढच्या षटकात युजवेंद्र चहलनं आफ्रिकेच्या सेट फलंदाजाला बवुमाला ( ३५) माघारी पाठवले. 


आफ्रिकेला १४.२ षटकांत ७४ धावा हव्या असताना मिळालेली ही विकेट सामन्याला कलाटणी देणारी ठरेल, असे वाटू लागले होते. फॉर्मात असलेल्या रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन आणि एडन मार्कराम यांनी आफ्रिकेचा डाव  सावरला. आफ्रिकेनं ४१व्या षटकात २५० धावांचा पल्ला पार केला. या दोघांनी आफ्रिकेचा ७ विकेट्स राखून विजय पक्का करताना मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. भुवनेश्वर कुमार पुन्हा महागडा ठरला. शार्दूल,  चहल, जसप्रीत यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. जसप्रीतनं १० षटकांत ३७ धावांत १  विकेट घेतली. तो वगळता भारताच्या अन्य गोलंदाजांनी ६च्या सरासरीनं धावा दिल्या. 

संक्षिप्त धावफलक - भारत ६ बाद २८७ धावा ( रिषभ पंत ८५, लोकेश राहुल ५५, शार्दूल ठाकूर ४०*, शिखर धवन २९, आर अश्विन २५*; तब्रेझ शम्सी २-५७) पराभूत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ३ बाद २८८ धावा ( येनमन मलान ९१, क्विंटन डी कॉक ७८, टेम्बा बवुमा ३५, एडन मार्कराम ३७*, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ३७* ).

Web Title: IND vs SA, 2nd ODI Live Updates : South Africa win the 2nd ODI by 7 wickets and seal the series by 2-0

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.