चेन्नई सुपरकिंग्सचा झाला भाग्योदय - फ्लेमिंग

केकेआरविरुद्ध विजय नोंदविल्यानंतर फ्लेमिंग म्हणाले, ‘पहिला सामना गमावल्यानंतर पुढचे तीनही सामने जिंकणे समाधानकारक आहे. आम्ही पाचपैकी तीन सामने जिंकण्याची अपेक्षा ठेवली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 04:20 AM2021-04-23T04:20:25+5:302021-04-23T04:20:40+5:30

CSK's fortune - Fleming | चेन्नई सुपरकिंग्सचा झाला भाग्योदय - फ्लेमिंग

चेन्नई सुपरकिंग्सचा झाला भाग्योदय - फ्लेमिंग

Next


मुंबई : दृष्टिकोन बदलणे आणि काही नव्या चेहऱ्यांना संघात स्थान दिल्यामुळे चेन्नई सुपरकिंग्सचे भाग्य बदलल्याचे मत मुख्य कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी व्यक्त केले आहे. मागच्यावर्षी पहिल्यांदा प्ले ऑफपासून दूर राहिलेल्या तीनवेळेच्या विजेत्या सीएसकेने यंदा चारपैकी तीन सामने जिंकले.
केकेआरविरुद्ध विजय नोंदविल्यानंतर फ्लेमिंग म्हणाले, ‘पहिला सामना गमावल्यानंतर पुढचे तीनही सामने जिंकणे समाधानकारक आहे. आम्ही पाचपैकी तीन सामने जिंकण्याची अपेक्षा ठेवली होती. पुढचा सामना जिंकला तर आमच्यासाठी आनंददायी ठरेल. आमचे फलंदाज सातत्यपूर्ण खेळ करीत असून फलंदाजीची चिंता मिटल्याचे मी सांगू शकतो. सॅम कुरेन याला मागच्या सत्रासारखा सूर गवसला. ऑफ स्पिनर मोईन अली याने तिसऱ्या स्थानावर खेळून स्वत:च्या भूमिकेला न्याय दिला. जे नवे चेहरे संघात आले त्यांनी कामगिरीत फरक निर्माण केला. संघाने आपला दृष्टिकोन बदलल्याचा देखील यश मिळविताना मोठा लाभ झाला.’
धोनीच्या आई-वडिलांना कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त काल आले. दरम्यान, फ्लेमिंग यांनी धोनीच्या आई-वडिलांच्या प्रकृतीवर रांची येथील इस्पितळात उपचार सुरू असून सीएसके व्यवस्थापन प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून असल्याची माहिती फ्लेमिंग यांनी यावेळी दिली.

डुप्लेसिसने माझे काम सोपे केले - ऋतुराज
‘फाफ डुप्लेसिस हा फलंदाजीदरम्यान गोलंदाजांवर वर्चस्व गाजवतो. त्याने केकेआरविरुद्ध असेच केल्यामुळे दुसऱ्या टोकावर माझे काम सोपे झाले होते,’ असे सीएसकेचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने सांगितले. सीएसकेच्या विजयात ऋतुराजने ६४ आणि डुप्लेसिसने ९५ धावांचे योगदान दिल्यानंतर वेगवान दीपक चहरने २९ धावात चार गडी बाद केले. सहकारी लुंगी एनगिडीसोबतच्या चर्चेत गायकवाड म्हणाला,‘फाफसोबत फलंदाजी करणे सोपे झाले होते. त्याच्याकडे वेगळेच काैशल्य आहे. तो गोलंदाजांवर सतत वर्चस्व गाजवितो, त्यामुळे माझे काम सोपे होऊ शकले. काल काहीवेळ क्रिजवर थांबणे  गरजेचे होते. 

मुंबईच्या मधल्या फळीकडून बोल्टला अधिक धावांची अपेक्षा
निराशाजनक कामगिरी करीत असलेल्या मुंबई इंडियन्सच्या मधल्या फळीला संदेश देताना वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने गुरुवारी म्हटले की, आयपीएलच्या आगामी सामन्यात फलंदाजांकडून अधिक धावांची अपेक्षा आहे.
गत चॅम्पियन मुंबई इंडियन्सच्या मधल्या फळीला या स्पर्धेत अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. फलंदाजही यामुळे खूश नसल्याचे बोल्टने म्हटले आहे.
पंजाबविरुद्धच्या लढतीच्या पूर्वसंध्येला बोलताना बोल्ट म्हणाला, ‘माझ्या मते आतापर्यंतच्या कामगिरीवर मधली फळीही खूश नसेल. पण खेळाडू धावांसाठी भुकेले असतील, याची कल्पना असून, पंजाबविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीत शानदार कामगिरी करण्यासाठी उत्सुक असतील. कारण चेन्नईमध्ये आमची ही शेवटची लढत आहे.’ 
बोल्ट पुढे म्हणाला, ‘आमची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने अधिक धावा फटकवायला हव्यात, असे आम्हाला वाटते. पण, या संघाची मजबूत बाजू म्हणजे अखेरपर्यंत आव्हान देणे ही आहे. गोलंदाज त्यात यशस्वी ठरले आहेत. आम्ही धावा फटकवण्यात यशस्वी ठरू, अशी आशा आहे.’
मुंबईने आतापर्यंत चार सामने खेळले असून त्यात दोन जिंकले असून दोन सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. संघाच्या मधल्या फळीला चारही लढतींमध्ये संघर्ष करावा लागला. एकदाही त्यांना १७०-१८० धावांच्या आसपास मजल मारता आली नाही. संघाच्या मधल्या फळीत ईशान किशन, हार्दिक पांड्या व त्याचा भाऊ कृणाल पांड्या यांच्याव्यतिरिक्त वेस्ट इंडिजचा आक्रमक अष्टपैलू किरोन पोलार्ड यांच्यासारख्या फलंदाजांचा समावेश आहे.

Web Title: CSK's fortune - Fleming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app