धरण उशाला,कोरड घशाला; औरंगाबादच्या पाणीटंचाईवर आज भाजपचा मोर्चा,१४ अटींवर परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 01:49 PM2022-05-23T13:49:44+5:302022-05-23T13:52:17+5:30
पैठण गेट ते गुलमंडी मार्गे महात्मा फुले चौक मार्गे सांस्कृतिक मंडळ ते मनपा असा मोर्चा जाईल
औरंगाबाद : शहरात दर आठवड्याला होणारा पाणीपुरवठा १,६८० कोटी रुपयांच्या नवीन जलवाहिनी योजनेच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामाविरोधात भाजप २३ मे रोजी सायंकाळी ४ वा. पैठणगेट ते महापालिकेपर्यंत मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करणार आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. कराड म्हणाले, शहरात आठ-आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. १,६८० काेटींची पाणीपुरवठा योजना आ. अतुल सावे यांनी फडणवीस हे मुख्यमंत्री असताना मंजूर करून घेतली. परंतु महाविकास आघाडी सरकारने नव्याने अध्यादेश काढून योजनेचे स्वरूप बदलले. त्याला मनपा प्रशासकांनीदेखील होकार दिला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिथे योजनेचे भूमिपूजन केले त्या ठिकाणचे कामदेखील सुरू झालेले नाही. सतरा ठिकाणी जलकुंभाचे काम सुरू केले, एकही काम पूर्ण झाले नाही. औरंगाबाद ते पैठण या महामार्गावर जलवाहिनीचे अलायनमेंट कसे असेल, याची माहितीदेखील समोर आलेली नाही. असे असेल तर ही जलवाहिनी१० वर्षे होणार नाही. या कारभाराविरोधात २३ मे रोजी मोर्चा काढून सरकारला जागे करण्यात येणार आहे. शहराध्यक्ष संजय केणेकर म्हणाले, सरकारने मोर्चाचा मार्ग बदलण्यासाठी पोलीस प्रशासनावर दबाव आणला. १४ अटींसह परवानगी दिली आहे. पैठण गेट ते गुलमंडी मार्गे महात्मा फुले चौक मार्गे सांस्कृतिक मंडळ ते मनपा असा मोर्चा जाईल, तेथे सभेने समारोप होईल. या मोर्चाची शिवसेनेने धास्ती घेतल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी राजू शिंदे, अनिल मकरिये, भगवान घडमोडे यांची उपस्थिती होती.
१२ टक्के झाले आहे योजनेचे काम
आ. अतुल सावे यांनी आरोप केला, ऑक्टोबर २०२० मध्ये योजनेचे काम सुरू झाले. ३ वर्षांत योजनेचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. आजवरच्या काळात फक्त १२ टक्के काम झाले आहे. आधी जलवाहिनी पैठण ते औरंगाबाद टाकणे गरजेचे होते, परंतु ते काम बाजूस ठेवून जलकुंभ बांधण्यास प्राधान्य दिल्याने ही योजना समांतरच्या दिशेने जाईल, अशी भीती आहे. योजना २०८० कोटींवर गेली असून साडेचार कि.मी. जलवाहिनीचे काम झाल्याचा दावा त्यांनी केला.