राम जी की निकली सवारी...छत्रपती संभाजीनगरात वाहन रॅली, शोभायात्रेने लक्ष वेधले
By प्रशांत तेलवाडकर | Published: April 18, 2024 12:53 PM2024-04-18T12:53:33+5:302024-04-18T12:54:14+5:30
रामनवमीनिमित्त बुधवारी सायंकाळी राजाबाजारातून निघालेल्या शोभायात्रेत अयोध्येतील रामलल्लाच्या भव्य कटआउटने सर्वांचे लक्ष वेधले.
छत्रपती संभाजीनगर : भगवान विष्णूंचे सातवे अवतार भगवान श्रीराम यांचा जन्मोत्सव रामनवमी बुधवारी शहरात उत्साहात साजरी झाली. यानिमित्त सायंकाळी क्रांती चौक, राजाबाजारसह शहरातील विविध भागातून निघालेल्या ४० पेक्षा अधिक वाहन रॅली व शोभायात्रेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रात्री ८ ते ८:३० वाजेदरम्यान आलेल्या पावसाने सर्व रामभक्तांचा उत्साह द्विगुणित झाला होता. थोड्या वेळासाठी शोभायात्रा थांबल्या होत्या; पण पुन्हा तेवढ्याच जोश, जल्लोषात शोभायात्रा निघाल्या.
‘एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता, बीच में जगत के पालनहारी, राम जी की निकली सवारी’ या गीतावर तरुणाई नृत्य करीत होती. मागील वर्षी रामनवमीला ३६ वाहन रॅली व शोभायात्रा निघाल्या होत्या. यंदा अयोध्येतील मंदिराच्या पार्श्वभूमीवर अधिक उत्साह जाणवला.
राजाबाजारातून सायंकाळी श्रीराम मित्र मंडळातर्फे शोभायात्रा काढण्यात आली. यंदा या शोभायात्रेचे १४ वे वर्ष होते. अयोध्येतील मंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीचे भव्य कटआऊट गाडीवर उभारण्यात आले होते. काही जण भगवा ध्वज घेऊन डीजेवरील गाण्यावर नृत्य करीत होते. समोरील बाजूस चाळीसगावचे बँडपथक धार्मिक धून वाजवित होते. राजाबाजार, शहागंज, सराफा बाजार, सिटी चौक, मछलीखडक, गुलमंडी, औरंगपुरा मार्गे कुंभारवाड्यातील श्रीराम मंदिरात शोभायात्रा पोहोचली.
बजाओ ढोल स्वागत मे
क्रांती चौकातून सायंकाळी बजरंग दलाच्या वतीने श्रीरामाची शोभायात्रा काढण्यात आली. सजविलेल्या वाहनात श्रीरामांची मूर्ती होती. ‘बजाओ ढोल स्वागत मे मेरे घर राम आए है’, ‘भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा’ या गाण्यावर रामभक्त नृत्य करीत होते. ही शोभायात्रा क्रांती चौक, नूतन कॉलनी, पैठणगेट, टिळकपथ, गुलमंडी, औरंगपुरा मार्गे कुंभारवाड्यातील श्रीराम मंदिरात पोहोचली.
वाहन रॅली
एकता समितीने खडकेश्वर मैदान ते किराडपुरा राम मंदिर अशी वाहन रॅली काढली. प्रत्येक वाहनावर मागील व्यक्तीने श्रीरामांचे छायाचित्र असलेला भगवा ध्वज धरला होता.
अयोध्येतील श्रीराम मंदिराचा देखावा
राजाबाजार येथून श्रीराम उत्सव समितीच्या वतीने दुपारी शोभायात्रा काढण्यात आली. वाहनात श्रीरामाची भव्य मूर्ती ठेवण्यात आली होती. समोरील वाहनात अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती होती. शोभायात्रा सिटी चौक, गुलमंडी, औरंगपुरामार्गे कुंभारवाड्यातील अमृतेश्वर राम मंदिरात पोहोचली.