मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 04:11 AM2024-04-29T04:11:27+5:302024-04-29T04:14:35+5:30

ओबीसी मते मिळविण्यासाठी स्टंट असू शकतो : जरांगे पाटील

lok sabha election 2024 Ink was thrown on Prakash Shendge's car manoj Jarange Patil made the allegation | मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप

मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप

छत्रपती संभाजीनगर : सांगलीत ओबीसी बहुजन पार्टीचे सांगलीचे उमेदवार प्रकाश शेंडगेंच्या गाडीवर शाईफेक करण्यात आली, तसेच मराठा आणि धनगर समाजाच्या नादी लागू नका, असे पत्र कारवर चिकटवून शेंडगेंना इशारा देण्यात आला. हा सगळा प्रकार ओबीसी मते मिळविण्यासाठी स्टंट असू शकतो. असे मत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले, काही जण असे आहेत की, ते स्वतः करतात आणि मराठ्यांची नावे पुढे करतात. सहानुभूती मिळवण्यासाठी अशी कटकारस्थाने होत असतील. मराठ्यांना बदनाम करण्याचे काम सुरू आहे. असे स्टंट करून सहानुभूती मिळवायला नको. मी मंत्री छगन भुजबळ वगळता कुणालाही विरोधक मानत नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले.

‘माघार घ्या, आमच्या नादी लागू नका...’

सांगली : सांगलीतील ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार, माजी आ. प्रकाश शेंडगे यांच्या मोटारीला अज्ञातांनी चपलांचा हार घालून काळे फासले. ‘निवडणुकीतून माघार आणि मराठा समाजाच्या नादी लागू नका’ असा धमकीचा मजकूर असलेले पत्रही चिकटवण्यात आले. सांगलीच्या मार्केट यार्डसमोरील एका हॉटेलसमोर रविवारी हा प्रकार घडला.  याबाबत शेंडगे म्हणाले, ‘मनोज जरांगे यांची मागणी संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीमध्ये घुसवण्याची आहे. त्याला आमचा विरोध आहे. ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष जिल्ह्यात नव्हता. परंतु आता उघड धमकी दिली आहे. त्याला मी घाबरणार नाही.’

मी कोणाच्या बापाला घाबरत नाही : छगन भुजबळ

नाशिक : सांगलीत माजी आ. प्रकाश शेंडगे यांच्या मोटारीवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा मंत्री छगन भुजबळ यांनी निषेध केला असून, आपण महायुतीतील उमेदवारीचा गोंधळ टाळण्यासाठी माघार घेतली आहे, कोणाला घाबरून नव्हे, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, असेही ते म्हणाले. 

रविवारी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना शेंडगे यांच्या मोटारीवरील हल्ल्याप्रकरणी चिंता व्यक्त करत पोलिसांनी याची गंभीर दखल घ्यावी, असे ते म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याची खिल्ली उडविताना भुजबळ म्हणाले, बेडकासारखे फुगवून जरांगे बोलतात.  मोदींना आपल्यामुळे महाराष्ट्रभर सभा घ्याव्या लागत आहेत, असे वक्तव्य जरांगे यांनी केले होते.   

शरद पवार यांच्याविषयी सहानुभूतीची लाट असल्याचे आपण म्हटले नव्हते, असा खुलासाही भुजबळ यांनी केला.

Web Title: lok sabha election 2024 Ink was thrown on Prakash Shendge's car manoj Jarange Patil made the allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.