नामकरण विरोधकांचा छत्रपती संभाजीनगरकर 'करेक्ट' कार्यक्रम करतील: एकनाथ शिंदे

By विकास राऊत | Published: May 8, 2024 03:06 PM2024-05-08T15:06:04+5:302024-05-08T15:07:23+5:30

मुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवारी रात्री सभेनंतर शहरात तळ ठोकून निवडणूक तयारीचा आढावा घेत पहाटेपर्यंत विविध घटकांच्या गटांसोबत चर्चा केली.

Chhatrapati Sambhajinagarkar will teach lesson to Naming Opponents: Eknath Shinde | नामकरण विरोधकांचा छत्रपती संभाजीनगरकर 'करेक्ट' कार्यक्रम करतील: एकनाथ शिंदे

नामकरण विरोधकांचा छत्रपती संभाजीनगरकर 'करेक्ट' कार्यक्रम करतील: एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर व धाराशिव या दोन जिल्ह्यांच्या नामकरणावर कोर्टाने शिक्कामोर्तब केला आहे. यामुळे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात नामकरणाच्या विषयाची भर पडली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कडक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. नामकरण विरोधकांचा छत्रपती संभाजीनगरकर 'करेक्ट' कार्यक्रम करतील, असा इशारा त्यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवारी रात्री सभेनंतर शहरात तळ ठोकून निवडणूक तयारीचा आढावा घेत पहाटेपर्यंत विविध घटकांच्या गटांसोबत चर्चा केली.

औरंगाबाद लोकसभा मतदार संघात प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवार पासून शहरात आहेत. काल वाळूज येथे औरंगाबाद लोकसभेच्या उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. तर आज दुपारी मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषदेस संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्याच्या नामकरणावार उच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत आहे. नामकरणाच्या विरोधात असलेल्यांना ही मोठी चपराक आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बसूनच आज मी माध्यमांशी बोलतोय आणि त्याच वेळी हा निर्णय आला. त्यामुळे याचा आनंद मोठा आहे. नामकरणाच्या विरुद्ध असलेल्यांचा छत्रपती संभाजीनगरवर प्रेम असलेले सर्व नागरिक 'करेक्ट' कार्यक्रम करतील, असा इशारा देखील शिंदे यांनी यावेळी दिला. 

मुख्यमंत्र्यांनी घेतला निवडणूक आढावा
मुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवारी पहाटे चार वाजेपर्यंत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या नियोजनासाठी आढावा घेतला. या अंतर्गत त्यांनी शहरातील काही व्यापारी, उद्योजकांच्या भेटी देखील घेतल्या. त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर आज सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत त्यांनी पक्षातील काही प्रमुख नेत्यांशी निवडणूक तयारीबद्दल चर्चा केली.

‘मातोश्री’वर पैसे पाठवावे लागत होते हे खरंय
उद्धव ठाकरे हे नकली हिंदुत्ववादी आहेत. त्यांना पैशाची भूक आहे. लेना बँक आहे, देना बँक त्यांना माहिती नाही. शिवसैनिकांना नोकर समजत होते. आता जो काम करील तो मोठा होईल. ‘राजा का बेटा राजा नहीं, तो जो काम करेगा व राजा बनेगा’. आयत्या पिठावर रेघोट्यादेखील मारता येत नाहीत. असे बोलून त्यांनी आदित्य ठाकरे यांनाही टोला लगावला. ठाकरे यांच्या उपचारावेळी आम्ही काही केले नाही. ज्या दिवशी शिवसैनिकांवर आरोप केले, त्याच दिवशी दावणीला बांधलेली शिवसेना सोडविण्यासाठी सत्तेला लाथ मारली. त्यांना उपमुख्यमंत्री फडणवीसांसह चार ते पाच भाजपाच्या नेत्यांचे व माझे राजकारण संपवायाचे होते. त्याआधी मीच त्यांचा टांगा पलटी केला, अशी जोरदार टीका मंगळवारच्या सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर केली.

Web Title: Chhatrapati Sambhajinagarkar will teach lesson to Naming Opponents: Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.