महायुतीत छत्रपती संभाजीनगरची जागा कुणाला यावर ठरणार ठाकरे गटाचा उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 11:27 AM2024-03-26T11:27:19+5:302024-03-26T11:28:19+5:30
जागा शिवसेनेला की भाजपच लढवणार? ठाकरेंना प्रतीक्षा
छत्रपती संभाजीनगर : महायुतीमध्ये औरंगाबाद मतदारसंघाची जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला येणार की भाजपच ही जागा लढवणार, यावर शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार ठरणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
महाविकास आघाडीमध्ये औरंगाबाद मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला आला आहे. मात्र ठाकरे गटाचे अद्याप या मतदारसंघातून उमेदवाराबाबत जाहीरपणे काहीही सांगितले नाही. महायुतीमध्ये मात्र ही जागा भाजपच लढवणार असल्याचे चित्र आधीपासून आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही ५ मार्च रोजी छत्रपती संभाजीनगरात झालेल्या सभेत ‘इथून दिल्लीला कमळ पाठवा’ असे आवाहन केले होते. त्यावेळी औरंगाबाद मतदारसंघ भाजप लढवणार यावर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी आणि प्रवक्त्यांनी औरंगाबाद मतदारसंघावर दावा सांगितल्याने महायुतीमध्ये या जागेवरून विवाद होऊन निर्णय प्रलंबित राहिला. भाजप आणि शिंदे गटात या जागेवरील चर्चा अजूनही सुरू आहे.
महायुतीमध्ये हे चित्र असताना दुसरीकडे ठाकरे गटाकडे चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे ही दोन नावे उमेदवारीसाठी स्पर्धेत आहेत. दोन्ही नेत्यांनी उमेदवारीबाबत दावा केला आहे. मात्र ठाकरे गट महायुतीमध्ये जागा कुणाला सुटते याची वाट पाहत असल्याचे चित्र आहे.
जातीचे समीकरण
महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला जागा गेल्यास ओबीसी उमेदवार असण्याची शक्यता आहे. अशावेळी शिवसेना ठाकरे गटाकडून मराठा उमेदवार दिला जाईल, अशी अटकळ आहे. जागा शिंदे गटाला गेल्यास उमेदवार मराठा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे गट मराठेतर उमेदवार देईल, असे मानले जात आहे. महायुतीदेखील ठाकरेंचा उमेदवार कोण याच्या प्रतीक्षेत असावी, अशीही एक शक्यता दिसत आहे.
विविध पक्षांचे स्पर्धक उमेदवार
भाजप : डॉ. भागवत कराड, अतुल सावे
शिवसेना (शिंदे गट): संदीपान भुमरे, विनोद पाटील
शिवसेना (ठाकरे गट) : चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे
एमआयएम : इम्तियाज जलील (नाव निश्चित)