पोलवर दुरुस्तीचे काम करताना अचानक वीज आली, शॉक लागून खासगी वायरमनचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 01:04 PM2024-05-16T13:04:35+5:302024-05-16T13:05:49+5:30

मृत्यू प्रकरणाचा पोलिसांकडून शोध सुरू

A private wireman died of shock due to sudden electricity while doing repair work on a pole | पोलवर दुरुस्तीचे काम करताना अचानक वीज आली, शॉक लागून खासगी वायरमनचा मृत्यू

पोलवर दुरुस्तीचे काम करताना अचानक वीज आली, शॉक लागून खासगी वायरमनचा मृत्यू

सिल्लोड ( जालना) : विजेच्या खांबावर दुरुस्तीचे काम करताना शॉक लागून खासगी वायरमनचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील बोरगाव सारवाणी येथे बुधवारी दुपारी ४ वाजता घडली आहे. विजय कमलाकर राऊत (वय २५ वर्षे, रा. डॉ. जाकीर हुसैननगर, सिल्लोड) असे मृताचे नावे आहे.

बोरगाव सारवानी येथील वीजपुरवठा खंडित झाल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी बुधवारी महावितरणचे पाच वायरमन व त्यांच्या हाताखाली काम करणारे कंत्राटी कर्मचारी या गावी गेले होते. मुख्य रोहित्रावरून वीजपुरवठा बंद केल्यानंतर हे कर्मचारी पोलवर चढवून दुरुस्तीचे काम करत होते. याचवेळी वायरमन राऊत हा गावाबाहेर शेतात असलेल्या एका पोलवर चढला असता शॉक लागून तो खांबावरून खाली कोसळला. त्यानंतर त्याला तत्काळ सहकाऱ्यांनी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथे डॉ. राम मोहिते यांनी त्याला मृतघोषित केले.

मृत्यू प्रकरणाचा पोलिसांकडून शोध सुरू
विजय हा खासगी कर्मचारी आहे. विजेचा फॉल्ट काढण्यासाठी त्याला पोलवर कुणी चढविले. वीजपुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम केले जात असताना नेमकी अचानक वीज कशी आली, वीजपुरवठा कुणी सुरू केला, वायरमन असताना खासगी कर्मचाऱ्याला वीज खांबावर का चढविण्यात आले, याचा शोध सिल्लोड ग्रामीण पोलिस व महावितरण अधिकारी घेत आहे. वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

चौकशी करणार
दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा शॉक लागून विजय राऊत याचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. परंतु त्याच्या मृत्यूस कोण जबाबदार आहे, याची चौकशी केल्यानंतर सत्य बाहेर येणार आहे.
- सचिन बन्सोड, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, सिल्लोड

Web Title: A private wireman died of shock due to sudden electricity while doing repair work on a pole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.