काळाने घातली झडप, आक्रोश करायलाही दिला नाही मजुरांना वेळ; थरकाप उडवणारी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2022 11:01 AM2022-05-21T11:01:02+5:302022-05-21T11:02:22+5:30

दोन्ही वाहनांची धडक होताच आगीचा भडका उडाला. आगीत तब्बल नऊ जण होरपळत होते; मात्र काळाने त्यांना आक्रोश करायला संधी दिली नाही.

9 Killed In Fire After Tanker-Truck Collision on Chandrapur-mul road | काळाने घातली झडप, आक्रोश करायलाही दिला नाही मजुरांना वेळ; थरकाप उडवणारी घटना

काळाने घातली झडप, आक्रोश करायलाही दिला नाही मजुरांना वेळ; थरकाप उडवणारी घटना

Next

राजेश भोजेकर

चंद्रपूर : काळ कधी आणि कुठे दबा धरून असेल, सांगता येत नाही. मग जर तरलाही थारा नसते. रात्री १०.३० वाजताची वेळ. काळ दबा धरून बसलेला. एका बाजूने लाकूड भरलेला ट्रक म्हणजे एकप्रकारची चिताच. त्यावर बसलेले मजूर म्हणजे जिवंत मृतदेहच, दुसरीकडे डिझेल टँकर म्हणजे चितेवर टाकण्यासाठी लागणारे तेल. असा काळयोगच होता तो...

दोन्ही वाहनांची धडक होताच आगीचा भडका उडाला. आगीत तब्बल नऊ जण होरपळत होते; मात्र काळाने त्यांना आक्रोश करायला संधी दिली नाही. चंद्रपूर-मूल मार्गावर अजयपूरनजीक झालेल्या अपघाताची भीषणता अंगाचा थरकाप उडविणारी होती. अपघातानंतर रस्त्याच्या मध्यभागी ज्वालामुखी उफाळून येतो, असे आगीचे लोळ उठले होते. या मार्गाने रात्रंदिवस वाहनांची वर्दळ असते. दोन्ही बाजूने वाहने धावत होती. मूलकडून चंद्रपूरकडे लाकडाने भरलेला ट्रक येत होता. त्या ट्रकमध्ये चालकासह कॅबीनमध्ये सहा मजूर बसले होते. तर विरुद्ध दिशेने येणारा चंद्रपूरकडून मूलकडे डिझेल टँकर जात होता. या टँकरमध्ये चालकासह क्लिनरही होता. अचानक दोन्ही वाहनांची धडक होताच स्फोट झाला आणि परिसर हादरला. या घटनेचे काही जण साक्षीदार होते. धडक होताच दोन्ही वाहनांनी पेट घेतला. आगडोंब उसळला.

प्रत्यक्षदर्शी धावले आणि जागीच थिजले

वाहनांमध्ये दोन चालक होते; मात्र त्याशिवाय किती जण होते, हे कळायला मार्ग नव्हता. सुमारे ५०० मीटरपर्यंत आगीच्या ज्वाळा अंगाला झोंबत असल्यामुळे कुणाचाही आक्रोश ऐकू येत नव्हता. परिसरातील लोकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेऊन घटनास्थळ गाठले. मदतीसाठी अनेक जण तयार होते. आगीची भीषणता बघण्याशिवाय काहीच करू शकत नव्हते. लगेच विविध ठिकाणच्या अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. सुमारे तासभरात सहा अग्निशमन वाहने पोहोचली. त्यांनी पाण्याचा मारा सुरू केला.

आग विझली आणि मृतदेहच दिसले

आग विझली, परंतु, कोणीही जवळ जाऊ शकत नव्हते. अखेर सकाळ झाली. तेव्हा लाकडाच्या ट्रकमध्ये आणि डिझेल टँकरमध्ये नऊ जणांचे मृतदेह कोळसा झालेल्या लाकडासारखे पडलेले होते. हे दृश्य पाहून धक्काच बसला. या घटनेची वार्ता पसरताच बापरे हा एकच शब्द प्रत्येकाच्या तोंडून निघत होता. ओळख पटली तेव्हा यातील सहा जण बल्लारपूर तालुक्यातील दहेली या गावची तरुण मुले असल्याचे कळले. या गावावर शोककळा पसरली. या हृदय हेलावणाऱ्या घटनेने चंद्रपूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

तातडीने प्रत्येकी पाच लाखांची मदत करा - सुधीर मुनगंटीवार

अजयपूरजवळ डिझेल टँकर व लाकूड भरलेल्या ट्रकच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ९ व्यक्तींना तातडीने प्रत्येकी ५ लक्ष रुपयांचे अर्थसहाय्य मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून जाहीर करावे, अशी मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. त्यांनी सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले. दरम्यान आ. मुनगंटीवार यांनी रुग्णालयात जाऊन मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. दारू पिऊन बेधुंदपणे वाहने चालविली जातात. या मद्यपी चालकांमुळे निरपराध लोकांचे जीव जातात व त्यांचे कुटुंब उघड्यावर पडतात. अशा परिस्थितीत मद्यपी वाहन चालकांमुळे नाहक आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या अनेक निराधार कुटुंबांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत शासनाच्या महसूल उत्पन्नातून देण्याची मागणी करणारे अशासकीय विधेयक येत्या विधानसभा अधिवेशनात आपण मांडणार असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

Web Title: 9 Killed In Fire After Tanker-Truck Collision on Chandrapur-mul road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.