चांगलं काम केलं?- नोकरीवरून थेट नारळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 09:16 AM2024-02-29T09:16:27+5:302024-02-29T09:16:36+5:30

आपल्या कंपनीशी प्रामाणिक राहणं मारिएलाला जास्त महत्त्वाचं वाटायचं आणि त्यासाठी  ती आपलं काम जबाबदारीने आणि पुढाकार घेऊन करायची; पण मारिएलाला हेच नडलं आणि चांगल्या कामाचं बक्षीस वजा शिक्षा म्हणून हातात निरोपाचा नारळ मिळाला. 

Did a good job? - remove straight from the job! | चांगलं काम केलं?- नोकरीवरून थेट नारळ!

चांगलं काम केलं?- नोकरीवरून थेट नारळ!

नोकरी सरकारी असू देत किंवा खासगी, छोट्या कंपनीतील असू देत किंवा मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीतील; चांगलं काम करावं, हीच कर्मचाऱ्यांकडून अधिकाऱ्यांची अपेक्षा असते. चांगलं काम केलं तर त्याचे परिणाम आपोआपच पगारवाढीतून, बढतीतून दिसून येतात; पण कामात कसूर केली तर मात्र  टीकेला, शिक्षेला सामोरं जावं लागतं; पण चांगलं काम केलं म्हणून कोणाला शिक्षा झाल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? जबाबदारीने काम केलं, कामात काहीच चुका केल्या नाहीत, कामं वेळेवर केली तर  त्याचं कौतुकच होणार, शिक्षा कशाला होईल, असं आपल्याला वाटत असलं, तरी चांगल्या कामाची शिक्षा एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या महिलेला भोगावी लागली. मारिएला हेन्रीक्वेझ हे तिचं नाव. अमेरिकेतील मियामी येथे एका मीडिया कंपनीत फोटोग्राफर आणि आर्ट डिरेक्टरचं काम करणाऱ्या मारिएलाला चांगलं काम केलं म्हणून कंपनीच्या मॅनेजरने कठोर शिक्षा दिली.

मारिएलाने तिच्या बाबतीत झालेल्या या अन्यायाला टिकटाॅकसारख्या समाजमाध्यमातून वाचा फोडली आहे. 
‘मी कंपनीत चांगलं काम केलं त्याची शिक्षा म्हणून मला कामावरूनच काढून टाकण्यात आलं,’ असं मारिएलाचं म्हणणं आहे. मारिएला नोकरीवरून काढून टाकण्याआधी नेमकं काय झालं? तिच्या बाॅसने  सेल्स डायरेक्टरसोबत मीटिंग्ज असल्याचं तिला सांगितलं. पुढील नियोजन आणि त्यातून सेल्सद्वारे होणारी अपेक्षित कमाई यावर ही मीटिंग असल्याने आपल्याला काही ग्राफिक्सही लागतील याची कल्पना मारिएलला तिच्या बाॅसने दिली; पण मारिएलाने आपण हे सर्व आधीच केलं असल्याचं ‘बाॅस’ला सांगितलं.   तिचा बाॅस ज्या प्रोजेक्टबद्दल बोलत होता त्याविषयीची माहिती तिने वेबसाइटवर आधीच टाकलेली होती. जे काम आठवडाभर मीटिंग घेऊन करावं लागणार होतं ते काम मारिएलाने बाॅसच्या सांंगण्याआधीच करून टाकलेलं होतं. खरंतर ही किती कौतुकाची गोष्ट होती; पण झालं उलटंच, आपण  सांगण्याआधीच मारिएलाने काम केलं असल्याचं पाहून बाॅस संतापला. त्याने मारिएलाला धारेवर तर धरलंच शिवाय  कामावरून तडकाफडकी काढूनही टाकलं. झाल्या प्रकाराने मारिएला संतापली, दु:खी झाली.  आपल्याला चांगल्या कामाची शिक्षा कशी होऊ शकते? असा प्रश्न  तिला पडला आहे.  शिवाय काही गोष्टींचे अर्थ उमगले असून, काही प्रश्नांची आपोआप उत्तरंही मिळाली आहेत.
आपल्या बाॅसचं आपल्याप्रती वागणं बदलल्याचं मारिएलला काही महिन्यांपासून लक्षात यायला लागलं होतं. खरंतर मारिएलामधील नेतृत्वगुणाला संधी तिच्या बाॅसनेच दिली होती. अनेकवेळा महत्त्वाच्या मीटिंगांमध्ये प्रेझेंटेशन करण्याची जबाबदारी मॅनेजर मारिएलावरच सोपवत असत; पण त्यासाठीचं किंचितही मार्गदर्शन मात्र ते करत नसत. ‘अनेक महत्त्वाची प्रेझेंटेशन मी स्वत:च्या हिमतीवर, कौशल्यावर तारून नेली’ असं मारिएला म्हणते. कंपनीत मार्केटिंग, सोशल मीडिया, ई-मेल मार्केटिंग या प्रत्येक गोष्टीत मारिएलानेच पुढाकार घेतला आणि कामं यशस्वीपणे पार पाडली, असंही ती सांगते.

 अनेक दिवस मॅनेजर महाशय ऑफिसमध्ये नसत. त्यांच्या अनुपस्थितीत नियोजन, मीटिंगा, फोन काॅल्स या सर्व आघाड्या मारिएला एकटीने लढवायची. कंपनीचं काम  मारिएलाने खोळंबू दिलं नाही; पण यामुळे तिच्या बाॅसला आपण निरुपयोगी असल्याची जाणीव तीव्रतेने झाली. आपण आपल्या कंपनीशी प्रामाणिक राहणं मारिएलाला जास्त महत्त्वाचं वाटायचं आणि त्यासाठी  ती आपलं काम जबाबदारीने आणि पुढाकार घेऊन करायची; पण मारिएलाला हेच नडलं आणि चांगल्या कामाचं बक्षीस वजा शिक्षा म्हणून हातात निरोपाचा नारळ मिळाला. 

आता तिच्या या कहाणीची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. अशा पद्धतीने अती-कार्यक्षमता दाखवण्याची मारिएलाला तरी काय गरज होती?- असे प्रश्न अनेकजण तिला विचारत आहेत. तुमच्याकडून अपेक्षित नसलेलं कामही तुम्ही असं (भसाभस) करून टाकणं ही कार्यक्षमता नव्हे, तर ओव्हरस्टेपिंग आहे आणि नव्या कॉर्पोरेट कल्चरमध्ये शहाण्या माणसाने त्या वाटेला जाऊ नये, असा सल्ला तर अनेकांनी तिला दिलेला दिसतो; पण गंमत आहे ती वेगळीच. सगळ्यात जास्त प्रतिक्रिया आहेत त्या एकाच प्रकारच्या : आम्हाला दिलेलं काम पूर्ण करताना मारामार होते, हिला इतकं एक्स्ट्रा काम करायला इतका वेळ तरी कसा मिळाला म्हणे?

कर्मचाऱ्यांच्या डोक्याला ताप 
‘सोसायटी फाॅर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेेंट’ या संस्थेने अमेरिकेतील कंपनी कर्मचाऱ्यांचं नुकतंच एक सर्वेक्षण केलं. त्यात ८४ टक्के कर्मचाऱ्यांनी किरकोळ प्रशिक्षण घेऊन मॅनेजर झालेल्यांना कंपनीतील कर्मचारी हाताळता येत नाहीत आणि येथील माणसंही सांभाळता येत नाही, असं सांगितलं. हे असे मॅनेजर पुढे कर्मचाऱ्यांच्या डोक्याला ताप देतात. १० पैकी ६ कर्मचाऱ्यांना मॅनेजरला जर चांगले प्रशिक्षण मिळाले तर ते नक्कीच कंपनीतील कर्मचाऱ्यांना नीट सांभाळू शकतील, असा विश्वास वाटतो.

Web Title: Did a good job? - remove straight from the job!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी