शरद पवारांचा बंगळुरू दौरा रद्द; विरोधकांच्या बैठकीला जाणार नाहीत, चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 08:19 AM2023-07-17T08:19:36+5:302023-07-17T08:20:24+5:30

आगामी २०२४ ची निवडणूक पाहता विरोधकांनी एकत्र येण्यासाठी हालचाली सुरू केल्यात. त्याचाच प्रत्यय पाटणा येथील बैठकीत आला. त्यानंतर विरोधकांची १७ आणि १८ जुलै रोजी बंगळुरूत बैठक होत आहे.

Sharad Pawar's Bangalore visit cancelled; Will not go to the meeting of the opposition | शरद पवारांचा बंगळुरू दौरा रद्द; विरोधकांच्या बैठकीला जाणार नाहीत, चर्चांना उधाण

शरद पवारांचा बंगळुरू दौरा रद्द; विरोधकांच्या बैठकीला जाणार नाहीत, चर्चांना उधाण

googlenewsNext

मुंबई – केंद्र सरकार आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आज बंगळुरूत विरोधकांची बैठक होत आहे. या बैठकीला भाजपाविरोधी पक्ष नेत्यांना निमंत्रण देण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने शरद पवार यांचाही सहभाग होता. विरोधकांची पहिली बैठक बिहारच्य पाटणा इथं झाली होती. त्यानंतर आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष होते. परंतु शरद पवार आजच्या बैठकीला जाणार नाहीत अशी माहिती समोर आली आहे. पवारांनी बंगळुरू दौरा रद्द केल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

शरद पवार बंगळुरूऐवजी आज मुंबईतच थांबणार आहेत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार पक्षाच्या आमदारांसोबत चर्चा करणार आहे. आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे शरद पवारांनी हा दौरा रद्द केल्याचे बोलले जात आहे. राज्यात राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशनानिमित्त शरद पवार आणि अजित पवार गटाचे दोन्ही आमदार आमनेसामने येणार आहेत. अधिवेशनाच्या आधी जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून राष्ट्रवादी काँग्रेस अद्याप विरोधी पक्षात असून ९ मंत्री वगळता पक्षाच्या इतर आमदारांची व्यवस्था विरोधी बाकांवर करावी अशी मागणी केली आहे. पक्षाचे आमदार अजित पवार गटात जाऊ नयेत यासाठी शरद पवार विशेष प्रयत्न करत आहेत.

आगामी २०२४ ची निवडणूक पाहता विरोधकांनी एकत्र येण्यासाठी हालचाली सुरू केल्यात. त्याचाच प्रत्यय पाटणा येथील बैठकीत आला. त्यानंतर विरोधकांची १७ आणि १८ जुलै रोजी बंगळुरूत बैठक होत आहे. विरोधकांसाठी ही बैठक महत्त्वाची आहे. या बैठकीचा मिनिट टू मिनिट अजेंडा निश्चित करण्यात आला आहे. विरोधी पक्षांना दिशा मिळावी यासाठी बैठकीत निर्णय घेतले जाणार आहेत. या २ दिवसीय बैठकीवर सर्वांचे लक्ष आहे. त्यात दरम्यानच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. शरद पवार यांना विरोधी पक्षातील प्रमुख चेहरा म्हणून पाहिले जात होते. त्यांच्या पक्षात मोठी फूट पडली. अजित पवारांसह ८ आमदारांनी थेट भाजपा-शिंदे सरकारला पाठिंबा देत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सर्व नेत्यांनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही भेट झाली. राष्ट्रवादीतील बंडखोर नेते अचानक शरद पवारांच्या भेटीला आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ कसा राहू शकतो, यासाठी त्यांनी योग्य विचार करावा आणि येणाऱ्या दिवसांत आम्हाला मार्गदर्शन करावे. पवार साहेबांनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले, पण कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही अशी माहिती प्रफुल पटेल यांनी दिली होती.

Web Title: Sharad Pawar's Bangalore visit cancelled; Will not go to the meeting of the opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.