ब्लॉगः मराठी म्हणजे Down Market??... तुम्हालाही असंच वाटतं?

By कोमल खांबे | Published: February 27, 2024 02:42 PM2024-02-27T14:42:13+5:302024-02-27T14:43:40+5:30

आज मराठी भाषा दिन... लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी... अशा आशयाचे स्टेटस आज आपल्या कित्येकांच्या स्टोरीला असतील. पण, खरंच आपल्याला आपल्या मातृभाषेचा अभिमान आहे का? महाराष्ट्रात जन्माला येऊनही आणि इथे राहत असूनही तुम्ही अनेकदा हिंदीतूनच संवाद साधता का?

Blog Marathi means Down Market? Do you think the same? | ब्लॉगः मराठी म्हणजे Down Market??... तुम्हालाही असंच वाटतं?

ब्लॉगः मराठी म्हणजे Down Market??... तुम्हालाही असंच वाटतं?

कोमल खांबे

आज मराठी भाषा दिन... लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी... अशा आशयाचे स्टेटस आज आपल्या कित्येकांच्या स्टोरीला असतील. पण, खरंच आपल्याला आपल्या मातृभाषेचा अभिमान आहे का? महाराष्ट्रात जन्माला येऊनही आणि इथे राहत असूनही तुम्ही अनेकदा हिंदीतूनच संवाद साधता का? इंग्रजी शाळेत शिकतात म्हणून तुमच्याही मुलांना मराठी बोलताच येत नाही का? 

लोकलमधून प्रवास करत असताना एका महिलांच्या ग्रुपचं संभाषण कानावर पडलं. तसं नेहमीच बायका ट्रेनमध्ये मुलांच्या परीक्षा, अभ्यास याबाबत बोलत असतात. आताही त्यांचा मुलांच्या शाळेतील परीक्षेवरूनच विषय सुरू होता. चार-पाच जणींचा ग्रुप असेल... नुकतंच त्यांच्या मुलांच्या शाळेत परीक्षा झाल्या होत्या आणि त्याचा निकालही लागला होता. माझ्या मुलाला एवढे मार्क मिळाले वगैरे असं त्यांचं संभाषण सुरू होतं. पण, मग नंतर मराठीतील मार्कांचा (गुणांचा) विषय सुरू झाला आणि माझे कान टवकारले... त्यातील एक जण म्हणाली, "माझा अद्वैत सगळ्यात पैकीच्या पैकी मार्क मिळवतो. गणित, विज्ञान, इंग्लिश सगळ्यात चांगले मार्क असतात... पण, मराठीतच त्याची गाडी गडगडते..." त्यालाच जोडून मग दुसरी देखील म्हणाली, "माझ्या मुलाचं पण सेमच आहे... मराठीच्या पेपरमध्ये नेहमी कमी मार्क असतात." दोघींचं संभाषण ऐकल्यानंतर तिसरीनेही तिच्या लेकीचे मराठीतील पराक्रम सांगितले. "अगं नाहीतर काय...मराठीत ४ मार्क घेऊन आलीय माझी मुलगी. ते कसं ना शाळेत पण ते इंग्रजीमध्येच बोलतात. घरी आल्यावर आम्ही पण इंग्लिशमधूनच बोलतो आणि खाली खेळायला गेल्यावर मुलं इंग्रजी किंवा हिंदीमधूनच बोलतात. म्हणून त्यांना मराठी बोलताच येत नाही. बोलता येत नाही, वाचता येत नाही आणि लिहिताही येत नाही," असं म्हणून ती बाई जोरात हसली. आपल्या मुलांना आपलीच मातृभाषा बोलता येत नाही याचं त्यांना गांभीर्य नव्हतं... त्यांना काहीच वाटत नव्हतं, हे त्या प्रसंगावरून मला जाणवलं. 

दुसरा प्रसंगही लोकलमधलाच... पेशाने त्या शाळेतील शिक्षिका वाटत होत्या. त्यातील दोघी दक्षिणेतल्या होत्या. त्यांच्या बोलण्यावरून तसं जाणवत होतं. हिंदीमध्ये त्यांचं बोलणं सुरू होतं.  त्यानंतर मध्येच त्यातील साऊथची एक जण मराठीतून बोलू लागली. तिचं मराठी ऐकून दुसरी तिला म्हणाली, "साऊथ की हो के भी अच्छा मराठी बोलती हो". त्यावर उत्तर देत ती म्हणाली, "हा मै मुंबई में ही पली बडी हू इसलिए". त्यावर साऊथमधील दुसरी शिक्षिका म्हणते की, "मै भी बहोत टाइम से मुंबई मै हू...लेकीन कभी मराठी बोलने की जरुरत ही नही पडी... उतना मराठी बोल लेती हूं... लेकीन यहाँ हिंदी बोला तो भी चलता है. इसलिए सीखा भी नही". 

दोन वेगवेगळे प्रसंग पण मुद्दा येऊन मराठी भाषेवर थांबतो... मुळात मुद्दा हाच आहे की, आपणच अनेकदा मराठीऐवजी हिंदी किंवा इंग्रजीतून संवाद साधतो. साधं भाजीवाल्याकडे गेलो तरी "भाजी कशी दिली" ऐवजी "कैसे दिया?" आणि "किती झाले" ऐवजी "कितना हुआ?" हेच आपल्या तोंडून बाहेर पडतं. समोरचा भाजीवाला 'भैय्या' आहे म्हणून आपण हिंदीत बोलतो का? तर मला वाटतं तसं नसावं. कारण, भाजीवाला मराठी असला तरीही आपल्या तोंडून हिंदीच बाहेर पडतं. आपल्याला हिंदी बोलायची सवय झाली आहे. ट्रेनमध्ये "कुठे उतरणार?" ऐवजी "Where r u getting down?" असंच अनेक जण विचारतात. तेव्हा समोरच्याला इंग्रजी पटकन कळलं नाही तर त्यांच्या कपाळावर आठ्याही पाहायला मिळतात. "एवढं इंग्रजी कळत नाही" असे हावभाव विचारणाऱ्याच्या चेहऱ्यावर दिसतात. आपल्याच नातेवाईकाच्या लहान मुलाला तुझं नाव काय? असं नाही तर "What is your name?" असं आपण विचारतो. आणि मग त्याचे पालकही तो इंग्रजी किती छान बोलतो याचे गोडवे गायला लागतात. पण, दुसरीकडे त्याची मातृभाषाच त्याला येत नाही, याचं त्यांना काहीच वाटत नसतं. पालकांनी त्यांच्या मुलांना कोणत्या शाळेत घालावं हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. पण, इंग्रजी शाळेत आहे म्हणून त्याला मराठी बोलता येत नसेल तर त्याला पालक जबाबदार आहेत आणि महाराष्ट्रात मराठीची कोरड पडत असेल तर त्याला सर्वस्वी आपण जबाबदार आहोत. 

महाराष्ट्रात दुकानावर 'मराठी पाट्या' (देवनागरी) लावण्यासाठी किंवा मराठी शाळांसाठी एखाद्या नेत्याला पुढाकार का घ्यावा लागतो? आंदोलनं का करावी लागतात? महाराष्ट्रातल्याच मराठी लोकांना वेळोवेळी मराठी किती महत्त्वाची आहे, हे सांगण्याची गरज का भासते?  मराठी पाट्या लावण्याचा आग्रह केला जातो, पण पुढच्या पिढीला ते वाचताच येणार नसेल, तर त्या शोभेच्या वस्तू बनून राहणार नाहीत का? आपली भाषा बोलणं down market वाटत असेल, तर कुठल्या मराठी भाषेचा अभिमान आपण बाळगत आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे.

Web Title: Blog Marathi means Down Market? Do you think the same?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.