यंदा खरिपात धानासोबत ऊस व तूर पिकांचाही पेरा वाढणार
By युवराज गोमास | Published: May 4, 2024 03:18 PM2024-05-04T15:18:48+5:302024-05-04T15:20:57+5:30
सर्वाधिक १.८१ लाख हेक्टरवर धान : गत वर्षाच्या तुलनेत ११ हेक्टरची वाढ
भंडारा : खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. लवकरच ग्रामीण भागात शेतावर सेंद्रिय खत टाकण्याच्या कामाला वेग येणार आहे. त्याचबरोबर धुरे स्वच्छ करणे, तणकट काढणे, पऱ्ह्यांची जागा तयार करणे आदी कामांची सुरुवात होणार आहे. खरिपाच्या दृष्टीने कृषी विभागही सज्ज झाला आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा धानासोबत ऊस व तूर पिकांचाही पेरा ११ हेक्टरने वाढणार आहे. बियाणे व खतांची उपलब्धता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
जिल्हा कृषी विभागाने यंदा खरिपाच्या लागवडीचे वाढविण्याचा चंग बांधला आहे. दरवर्षी जुलै महिन्यापासून खरीप पिकांच्या लागवडीला सुरुवात होत असत. यंदाही तसा प्रारंभ केला जाणार आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात १ लाख ९६ हजार हेक्टरवर पिकांची लागवड करण्याचे कृषी विभागाचे उद्दिष्ट आहे. यंदाही दरवर्षीप्रमाणे सर्वाधिक १ लाख ८१ हजार हेक्टर क्षेत्रात धान पीक घेतले जाणार आहे.
बियाणे, खत उपलब्धतेवर अधिक भर
भंडारा जिल्ह्यात मुख्यत्वे धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळेच जिल्ह्याला धानाचे कोठार म्हटले जाते. खरिपाचे नियोजन कृषी विभागाने केले असून खते, बियाणे, कीटकनाशके पर्याप्त उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी तयारी चालविली आहे. विविध कामांचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यावर्षी धानासोबतच तूर आणि उसाचा पेरा वाढविण्यावर अधिक लक्ष पुरविले जाणार आहे.
पडीक क्षेत्र येणार लागवडीखाली
वाढीव लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिकुटुंब जमिनीचे क्षेत्र कमी पडत आहे. त्यामुळे यंदा लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी पडीक जमील लागवडीखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरित केले जाणार आहे. पडीक क्षेत्रावर पीक घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. असाच प्रयत्न दरवर्षी केला जाणार असल्याने पीक लागवडीखालील क्षेत्र वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. मागील वर्षी १ लाख ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड झाली होती. यावर्षी १ लाख ९६ हजार हेक्टरवर पिकांची लागवड होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
यंदाचे पीकनिहाय लक्षांक (हेक्टर)
पीक क्षेत्र
धान १,८१,२५४
तूर ११,४००
ऊस २,३००
सोयाबीन १,१४०
४०० हेक्टरने वाढणार तुरीचे क्षेत्र
यंदा खरिपात ११,४०० हेक्टर क्षेत्रावर तूर पिकाची लागवड होणार आहे. यंदा तुरीचा पेरा ४०० हेक्टरने वाढणार आहे. त्यापाठोपाठ ऊस आणि सोयाबीनची लागवडही वाढविली जाणार आहे. २ हजार ३०० हेक्टरवर उसाची, तर १ हजार १४० हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली जाणार आहे.
यंदा लागवडीचे क्षेत्र वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. शेतकऱ्यांना वेळेत व गरजेनुसार खते, बियाणे वेळेवर उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. खते, बियाणे खरेदी करताना दुकानदारांकडून फसवणूक होत असेल तर तातडीने कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. अधिकृत कृषी केंद्रामधून खते, बियाणे व कीटकनाशके खरेदी करावीत. पक्के बिल विक्रेत्यांकडून घेऊन जपून ठेवावे.
- संगीता माने, जिल्हा अधीक्षक, कृषी विभाग, भंडारा.