प्रति बॉटलमागे ५ रुपयांची लूट!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 01:05 PM2024-05-15T13:05:32+5:302024-05-15T13:07:00+5:30
Bhandara : वाद घातल्यावरच २० ची बॉटल मिळते पंधराला
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात मे महिन्याचा कडाका सुरू आहे. कडक उन्हामुळे रेल्वेस्थानकावर तसेच बसस्थानकावर पाण्याच्या बॉटलची मागणी वाढली आहे; परंतु रेल्वे व बसस्थानकावर पाण्याची बॉटल अनेकदा २० रुपयांना मिळते. अशावेळी प्रवाशांनी किरकोळ विक्रेत्यांसोबत वादावादी केल्यानंतर प्रसंगी १५ रुपयांना पाण्याची बॉटल विकली जाते.
प्रवासादरम्यान अनेकदा नागरिकांकडे सुट्टे पैसे नसतात. - रेल्वेस्थानकावर पाण्याची बॉटल खरेदी केल्यास ती मूळ किमतीत मिळते; मात्र रेल्वेगाड्यांमध्ये प्रवासादरम्यान पाण्याच्या बॉटलची विक्री २० रुपयांना केली जाते. एखाद्या प्रवाशाने वाद घातल्यानंतरच संबंधित विक्रेते बॉटल १५ रुपयांना देतात; मात्र पाण्याच्या बॉटलसाठी नागरिकांना १५ रुपयांपेक्षा जास्त पैसे देण्याची गरज नाही. जर कोणी मूळ किमतीपेक्षाही जास्त रुपयांना बॉटल विकत असल्यास त्याची तक्रार तुम्ही ग्राहक म्हणून करू शकता. त्यानंतर विक्रेत्यांवर कारवाई केली जाते.
रेल नीर, नाथ जल १५ रुपयांना
• रेल्वेने प्रवाशांची आर्थिक लूट थांबावी आणि प्रवाशांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी 'रेल नीर' आणि एसटीने 'नाथ जल' बाटलीबंद पाण्याची सुविधा सुरु केली आहे. ही सुविधा प्रत्येक रे आणि बसस्थानकावर उपलब्ध आहे. या बॉटलची किमत ही १५ रुपये असून, नागरिकांनी ती तितक्याच रुपयांना विकत घ्यावी.
बाटलीमागे पाच रुपयांची लूट
• नागरिक बसस्थानकावर नाथ जल खरेदी करतात. या ठिकाणी मूळ किमतीतच नाथ जल नागरिकांना, प्रवाशांना उपलब्ध होते. पाणी थंड करण्याचे पैसे अतिरिक्त घेतले जात नाहीत. अनेक ठिकाणी प्रवाशांसाठी मोफत थंड पाण्याची सुविधा असल्याने प्रवासी लाभ घेतात.
• रेल्वेस्थानकावर नागरिकांना रेल नीर ही पाण्याची बाटली ही १५ रुपयांनाच उपलब्ध करून दिली जाते; परंतु अनेकदा पाच रुपये चिल्लर नसल्याने २० रुपयांत बॉटल खरेदी करावी लागते. मात्र कारवाई केली जात नाही. त्यामुळे अतिरिक्त्त पैसे घेणे सुरूच ठेवले जाते.
कारवाई कोण करणार?
बसस्थानक परिसरात नागरिकांना १५ रुपयांच्या मूळ किमतीतच 'नाथ जल' ही पाण्याची बाटली उपलब्ध करून दिली जाते. त्याहून जास्त रक्कम कोणीही देऊ नये. जास्त किमतीत कोणी विक्री करताना आढळून आल्यास त्याची तक्रार करावी: परंतु कुणी प्रवासी चिल्लर पैसे नाहीत म्हणून १५ रुपयाच्या बॉटलसाठी २० रुपये देत असेल, तर त्याला नाइलाज असतो.
- शीतल सिरसाट, विभागीय वाहतूक अधिकारी, भंडारा.