तोडणीही परवडेना; हिरव्या मिरचीने आणले डोळ्यांत पाणी
By युवराज गोमास | Published: May 2, 2024 08:17 PM2024-05-02T20:17:19+5:302024-05-02T20:18:17+5:30
बाजारात मिरचीचे भाव कोसळले : शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघेना
भंडारा: शेतकरी सध्या अवकाळी वादळी पाऊसाने तसेच शेतमालाचे भाव कोसळल्याने चांगलाच संकटात सापडला आहे. बाजारात हिरव्या मिरचीला किरकोळ विक्रीत ३० रूपयांचा भाव मिळतो आहे. परिणामी हिरव्या मिरच्यांनी तोड्याअभावी झाडावरच नांगी टाकल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. हीच स्थिती लाल मिरचीच्या बाबतीतही दिसून येत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर २५० ते ३०० रूपयांपर्यंत कडाडणारी लाल मिरची यंदा १५० रूपयांपर्यंत खाली उतरली आहे.
अवकाळी संकटाशी दोन हात करून बळीराजा शेती फुलवीत आहे. परंतु, घामाच्या थेंबांनी शेती हिरवीगार करणारा बळीराजा यंदा मात्र बाजारभाव गडगडल्याने पुरता खचला आहे. पडलेल्या बाजारभावाने मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
मागील वर्षी मिरचीला चांगला भाव मिळाला. प्रति क्विंटल तीस हजार रुपयांपर्यंत भाव होता. उत्पादन अल्प झालं होतं. मात्र वाढलेल्या बाजारभावाने शेतकरी फायद्यात राहिले. मिरचीला मिळालेला योग्य भाव बघता यावर्षी जिल्ह्यात मिरचीचा पेरा वाढला. तुलनेत उत्पादन मोठे झाले. मात्र, बाजारभाव कोसळला. हिरव्या मिरचीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. मिरची तोडणीचा खर्चही यातून भागताना दिसत नाही. घर खर्च चालविण्याची ऐपतही मिरची उत्पादक शेतकऱ्यांची राहिलेली नाही.
स्थानिक मजुरांच्या रोजगाराला फटका
सध्या शेतशिवारात मिरची तोडणी शेवटच्या टप्पा सुरू आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे पहाटे ७ ते १२ वाजेपर्यंत मजूर मिरची तोडतात. यातून त्यांना दोनशे ते तीनशे रुपये मजुरी मिळत असते. मिरचीमुळे स्थानिक मजुरांच्या हातांना रोजगार मिळतो. परंतु, भाव गडगडल्याने स्थानिक मजुरांच्या रोजगारावर परिणाम जाणवत आहे. अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक खर्च परवडणारा नसल्साने तोडणी बंद केली आहे.
खर्च लाखाचा, उत्पन्न मात्र अत्यल्प
मिरची लागवडीसाठी एका एकराला साधारणता एक लाखाच्यावर खर्च अपेक्षित असते. परंतु, सध्या पडलेल्या भावामुळे मिरची लागवडीसाठी लावलेला खर्चही निघेना अशी बिकट स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मिरची पिकाने दिलेला आर्थिक दगाफटका बघता पुढील वर्षी पेरा कमी होण्याची शक्यता शेतकरी श्रीकृष्ण वनवे यांनी व्यक्त केली आहे.