फक्त एकच घर असलेले गाव 'खोडगाव'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 03:32 PM2024-04-29T15:32:17+5:302024-04-29T15:34:47+5:30

ऐकावे ते नवलचं : भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात येणाऱ्या खोडगावात आहे फक्त एक घर

A village with only one house 'Khodgaon' | फक्त एकच घर असलेले गाव 'खोडगाव'

Village with the only House

मोहाडी : एका घराचा गाव कधी बघितला आहे का, आश्चर्य आहे ना. होय, हे अगदी खरं आहे. पूर्वी झाडी-झुडपे जंगलाने आच्छादलेला तो गाव, मोहाडी तालुक्यात प्रसिद्ध असलेला खोडगाव हे नाव. खोडगावात एकच घर आहे. तो गाव शासनाच्या दरबारीसुध्दा बघायला मिळेल, पारडी गट ग्रामपंचायत गावाला जोडलेला तो आहे खोडगाव, पारडी गावापेक्षा खोडगाव याच गावाची चौफेर ओळख आहे, या गावात जागृत हनुमानाचे मंदिर आहे. इतर दिवशी भाविक त्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतात. पण, मंगळवार व शनिवार रोजी या हनुमानाच्या मंदिरात मोठ्या संख्येने भाविकांचे खोडगावकडे पाय वळतात. आता प्रश्न नक्की पडला असेल एका घराचा गाव कसा असू शकतो. याला पण इतिहास आहे. आता हल्ली खोडगाव येथे शारदा तिवारी यांचं घर आहे. खोडगाव येथील शारदा तिवारी व पारही येथील वयोवृद्ध  बळीराम झंझाड यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, तीन पिढ्यांपूर्वी म्हणजे, स्वातंत्र्यपूर्व काळात खोडगावात ७० ७५ घरांची वस्ती होती. 

खोडगावात वाजपेयी नावाचे व्यक्ती होते. ते गावाचे पाटील (मालगुजार) होते, वाजपेयी त्या गावातील कर (वायदा) गोळा करण्याचे काम करीत होते. ज्यांनी कर दिला नाही. त्यांची शेतजमीन ताब्यात घेतली जात असे. कर भरू न शकल्याने खोडगावातून पडोळे, रामटेके, मेश्राम आदी परिवारातील व्यक्ती त्या गावातून पलायन करू लागले होते. खोडगावातील व्यक्तींनी पारडी, चिचखेडा, मांडेसर आदी आजूबाजूच्या गावात आसरा घेतला होता, एक वेळ अशी आली की, खोडगावात केवळ वाजपेयी यांचाच वाडा शिल्लक राहिला होता, कारण वेगळच आहे. खोडगावच्या मंदिरालगत सुरनदी आहे. पूर्वी या नदीला खूप पूर यायचा, काही घरे पाण्यात यायची, त्याही कारणांमुळे बरीच कुटुंब खोडगाव सोडून गेली. मात्र, वाजपेयी यांच्या वाड्यात पुराचे पाणी जात नव्हते. त्यामुळे शेवटपर्यंत वाजपेयी यांनी आपले मूळ गाव सोडून गेले नाहीत. चंद्रमोहन तिवारी यांनीही खोडगाव सोडला नाही. वाजपेयी यांना शामाबाई व किशोराबार्ड या दोन मुली होत्या. त्यांचा लग्नानंतर चंद्रमोहन तिवारी व पांडे नामक कुटुंब घरजावई म्हणून खोडगावात आले. चंद्रमोहन तिवारी परिवारात चार भाऊ मुक्कू तिवारी, गणेश तिवारी, सतीश तिवारी व बबलू तिवारी अशा चार भावांचे कुटुंब खोडगावात राहू लागले. कालांतराने बबलू तिवारी यांना सोडून तीन भाऊ शहरात व्यवसायासाठी बाहेर पडले

चार लोकसंख्येचे गाव
खोडगावात एकच घर असून, चार लोकसंख्येचे गाव आहे. बबलू तिवारी यांची पत्नी शारदा तिवारी. त्यांचा एक भाऊ व दोन मुली असा चार जणांचे कुटुंब खोहगावात वास्तव्यास आहे. आजघडीला शारदा तिवारी यांच्याकडे एक एकर शेतजमीन आहे. शारदा तिवारी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीकामाशिवाय मंदिरात पूजा साहित्याची विक्री करून करतात.

Web Title: A village with only one house 'Khodgaon'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.