वीज कोसळल्याने ४ वर्षात २६ जणांचा मृत्यू; १६ प्रस्तावांना मंजूरी केव्हा?
By युवराज गोमास | Published: May 14, 2024 06:51 PM2024-05-14T18:51:55+5:302024-05-14T18:52:50+5:30
जिल्ह्यात कोसळणारी वीज थांबणार कधी? : यंदा ११ जनावरांचा मृत्यू
भंडारा : जिल्ह्यात सन २०२२ ते २०२३ या कालावधीत वीज कोसळून २६ जणांचा जीव गेला. यंदा अवकाळीत जीवहानी झाली नसली तरी ११ जनावरांचा मृत्यू झाला. परंतु, जिल्ह्यात एकही ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्यावतीने यंदा सुधारीत १६ प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले. परंतु, अद्यापही मंजूरी मिळाली नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोसळणारी थांबणार तरी केव्हा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात वीज कोसळून सर्वाधिक मृत्यू शेतशिवारात, मोकळ्या जागेत झाले आहेत. सध्या जिल्ह्यात अवकाळी वादळी पावसासह विजेच्या कडकडाटाने थैमान घातले आहे. यामुळे उन्हाळी धान पीक व भाजीपाला पीक संकटात सापडले आहेत. कुठे ना कुठे वीज कोसळण्याची चिन्हे दिसून येतात. घराबाहेर पडायची भीती नागरिकांत असते.
जिल्ह्यात २०२० मध्ये वीज कोसळून चार जणांचा बळी गेला. यात भंडारा, पवनी व तुमसर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. २०२१ मध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. यात भंडारा, तुमसर तालुक्यातील प्रत्येकी एक, तर मोहाडी तालुक्यातील चार जणांचा समावेश आहे. २०२२ मध्ये १४ जणांचा मृत्यू झाला. यात भंडारा एक, पवनी तीन, तर तुमसर तालुक्यातील दोघांचा समावेश आहे.
काय आहे वीज अटकाव यंत्रणा?
शहरातील सर्वाधिक उंच इमारतीवर वीज अटकाव यंत्रणा कार्यन्वित केली जाते. ही यंत्रणा १०० मीटर परिसरात वीज कोसळण्यास अटकाव करते; परंतु यासाठी लाखोंचा खर्च येतो. जिल्ह्यात अशी यंत्रणा कुठेही नाही.
सुधारीत प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
जिल्ह्यात वीज अटकाव यंत्रणा कार्यन्वित करण्यासंबंधीचे सुधारीत १६ प्रस्ताव जिल्हा आपत्ती व्यवस्थापच्यावतीने शासनाकडे पाठविले आहेत. यापूर्वी २०१७ मध्ये यासंबंधीचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते; परंतु कुठेही प्रश्न निकाली निघाला नाही.
जिल्ह्यात एकही यंत्रणा कार्यान्वित नाही
जिल्ह्यात १३३० मिलिमीटर पाऊस होतो. सध्या विजेच्या कडकडाटासह अवकाळी मुसळधार पाऊस कोसळत आहे. विजेच्या धक्क्याने चार वर्षांत २६ जणांचा बळी गेला. परंतु, अद्यापही वीज अटकाव यंत्रणा एकाही ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांत सातत्याने भीतीचे वातावरण पाहावयास मिळते.
मृताच्या कुटुंबियांना मिळणारी मदत
शासनाच्यावतीने मृत्यू पावलेल्याच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत दिली जाते. ४० ते ६० टक्के अपंगत्वासाठी यापूर्वी ५९,१०० तर आता ७४ हजार, ६० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्वासाठी पूर्वी दोन लाख तर आता २.५० लाख, एक आठवड्यापेक्षा जास्त काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यास पूर्वी १२,७०० तर आता १६ हजार व त्यापेक्षा कमी काळ उपचारासाठी पूर्वी ४,३०० तर आता ५४०० रुपयांची मदत दिली जाते.
जिल्ह्यात वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित करण्यासंबंधीचे १६ सुधारीत प्रस्ताव शासनाकडे पाठविले आहेत. सध्या विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होत आहे. नागरिकांनी मोकळ्या मैदानात व पावसात थांबू नये. दामिनी ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन माहिती घ्यावी.
- अभिषेक नामदास, प्रमुख आपत्ती व्यवस्थापन, भंडारा.
वीज पडून झालेले मृत्यू
वर्ष मृत्यू संख्या
२०२४ ००
२०२३ ०२
२०२२ १४
२०२१ ०६
२०२० ०४